शरद पवारांचा राणे पुत्रांना सल्ला, वडिलांचे गुण अंगिकारल्यास शिखर गाठणे शक्य

0
477

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या `झंझावात` या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. राणे यांच्या आत्मचरित्राला पवार यांनी प्रस्तावना लिहिली आहे. राणे यांनी शून्यातून सुरू केलेल्या राजकीय प्रवासाचे कौतुक करताना त्यांनी राणे यांच्या दोन्ही पुत्रांनाही एक सल्ला दिला आहे. हा सल्ला जर त्यांनी अमलात आणला तर त्यांचा अभ्युदय निश्चित असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राणे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते मुंबईत दोन दिवसांपूर्वी झाले. त्या वेळीही पवार यांनी राणे यांचे अगदी मनापासून अभिनंदन केले. पवार यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर असल्याचा उल्लेख राणेंनी पुस्तकात अनेक ठिकाणी केला आहे. राणे यांच्या पुस्तकाला पवार यांनी प्रांजळपणे प्रस्तावना लिहिली आहे. राणेंचे गुणदोष, चुकलेल्या राजकीय खेळी याबाबतही त्यांनी टिप्पणी केली आहे. तसेच तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे राणे यांच्या डावपेचाला कसे तोडीस तोड उत्तर देत होते, याचाही उलगडा पवार यांनी यात केला आहे. पवार म्हणतात, “राणेंच्या राजकीय प्रवासातील सगळी नाटय़मय वळणे मी अगदी जवळून बघितलेली आहेत. कोणत्याही वळणावर त्यांचे आणि माझे संबंध सौहार्दाचे राहिले आहेत. त्यांचा आक्रमकपणा सर्वश्रुत आहे. तळागाळातून हिमतीने उभे राहून, तावून-सुलाखून तयार झालेल्या व्यक्तीच्या ठायी असा आक्रमकपणा असतोच. असे त्यांनी नमूद केले आहे.

या प्रस्तावनेत पवार यांनी चार वाक्ये राणे यांच्या कुटुंबाबद्दल लिहिले आहेत. “त्यांच्या प्रचंड कार्यात सतत काळजी वाहणारी, खंबीरपणे साथ देणारी अर्धागिनी सौ. नीलमताई पत्नी म्हणून त्यांना लाभली आहे,“ त्यांचे पुत्रे निलेश आणि नितेश यांनाही मार्गदर्शनाचे चार शब्द सांगितले आहेत. “निलेश आणि नितेश हे दोन्ही मुलगेदेखील राजकारणात स्वत:ला सिद्धकरतांना दिसून येत आहेत. वडिलांमधील आक्रमकता, अनुकंपा, अनन्यसाधारण धडाडी, विनम्रता आणि मुख्य म्हणजे अभ्यासू वृत्ती हे गुण त्यांनी अंगिकारले, तर त्यांना राजकीय उच्च शिखर गाठता येणे शक्य आहे,“ असे पवार यांनी खात्रीपूर्वक नमूद केले आहे.