#SakinakaRapeIncident । या प्रकरणावरून कोणीही राजकारण करू नये; हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न – संजय राऊत

0
291

पुणे,दि.११(पीसीबी) – साकीनाका बलात्कार प्रकरणातील पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे. या दुर्देवी घटनेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नक्कीच आहे, असा घरचा आहेर संजय राऊत यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. तसेच या घटनेवरून राजकारण न करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्य सरकारला आरसा दाखवला आहे. ही अत्यंत दुर्देवी आणि धक्कादायक घटना. मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित असल्याची भावना कायम आहे. जगभरातील सुरक्षित शहरात मुंबईचं नाव वरच्या स्थानी आहे. मुंबई हे महिलांसाठी अत्यंत सुरक्षित शहर आहे. ही घटना घडली. त्यावरून गदारोळ सुरू आहे. महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. हा कायदा सुव्यवस्थेचा नक्कीच प्रश्न आहे. महिला सुरक्षेचा प्रश्न आहे. पण त्यावरून राजकारण करू नका आणि गोंधळ उडवून सरकारवर चिखलफेक करण्याचं राजकारण करू नये. कारण अशाप्रकारच्या घटना राज्याला मान खाली घालायला लावतात, असं राऊत म्हणाले.

आता काही ठिकाणी माणसं जमवण्याचे प्रकार सुरू आहेत. ते टाळायला हवं. या दुर्देवी घटनेचं राजकारण करणं म्हणजे त्या मृत महिलेवरच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे. ते काही काळ थांबलं पाहिजे, असं सांगतानाच या घटनेतील आरोपींना नक्की कठोर शासन होईल, असं त्यांनी सांगितलं. या घटनेची तुलना निर्भया प्रकरणाशी केली जात आहे. तुलना करायला हरकत नाही. कारण यात एका महिलेने जीव गमावला आहे. तिच्या जीवनाची विटंबना झाली आहे. महाराष्ट्रातल्या मातीत त्या काळात छत्रपती महाराजांनी महिलांना संरक्षण दिलं. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही तोच मार्ग स्वीकारला आहे. अशा दुर्देवी घटना घडू नये म्हणून सरकारने अधिक कठोर पावलं उचलली पाहिजे. सरकार ते उचलल्या शिवाय राहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.