PUBG खेळणाऱ्यांसाठी खुशखबर!

0
603

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – तरुणाईला वेड लावणारा PUBG हा गेम खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अनेक चाचण्यांनंतर भारतात ‘PUBG Lite’ हे नवे व्हर्जन अखेर लाँच होणार आहे. यापूर्वी ‘PUBG Lite’ हे व्हर्जन हाँगकाँग, तायवान, ब्राझील आणि बांगलादेश अशा देशांमध्ये जानेवारी महिन्यातच लाँच झालं आहे. PUBG या मोबाइल गेमची ‘PUBG Lite’ ही संगणकासाठीची ‘लाइट’ आवृत्ती असून याला मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे. अर्थात कमी क्षमतेचे म्हणजेच लोअर कॉन्फीग्युरेशन असणाऱ्या कंप्युटर्सवर आता हे गेम खेळता येणार आहे. यापूर्वी केवळ महागड्या अर्थात हायर कॉन्फीग्युरेशन असणाऱ्या कंप्युटर्सवरच हा गेम खेळता येत होता.

पबजी इंडियाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन देखील याबाबत माहिती देण्यात आली आहे. ‘PUBG Lite’ भारतीयांच्या भेटीला लवकरच येत आहे अशा आशयाचा संदेश फेसबुक पेजवर दिसत आहे. यासोबत ताजमहाल सारखा एक फोटो देखील अपलोड करण्यात आला आहे. हा गेम खेळण्यासाठी किमान कोअर आय ३ प्रोसेसर, ४ जीबी रॅम व इंटेलचा ग्राफीक प्रोसेसर असणे आवश्यक आहे. मुख्य आवृत्तीतील सर्व फीचर्स या लाइट आवृत्तीमध्ये देण्यात आले आहेत. पण लाइट आवृत्तीमध्ये ग्राफिक्स कमी दर्जाचे असणार आहेत.

पबजीची मालकी असणाऱ्या टेनसेंट गेम्स या चिनी कंपनीने १३ जून रोजी कोलकातामध्ये एका इव्हेंटचे आयोजन केलं आहे. या इव्हेंटमध्येच ‘PUBG Lite’ लाँच केला जाण्याची शक्यता आहे, अन्यथा या महिन्याच्या अखेरीस कंपनी ही नवीन आवृत्ती लाँच करेल.