Chinchwad

ब्लॅकमेल करणाऱ्या शिवशाही प्रदेशाध्यक्षाविरोधात पोलिसांत तक्रार

By PCB Author

August 29, 2019

वाकड, दि. २९ (पीसीबी) – अनधिकृत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना ब्लॅकमेल करून हजारो रूपये उकळल्याप्रकरणी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष व तिरोडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना संपर्क प्रमुख युवराज दाखले यांच्याविरोधात वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याबाबत अनेक नागरिकांनी वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश माने यांना तक्रार अर्ज दिला. त्यावळी सहाय्यक पोलिस निरिक्षक विरेंद्र चव्हाण उपस्थित होते.  

पुनम विश्वकर्मा व संजय देसाई (दोघेही रा. बालाजी कॉलनी, थेरगाव) असे तक्रारदारांची नावे आहेत. तक्रारीत म्हटले आहे की, तक्रारदाराचे जुने पत्र्याचे घर पाडून नवीन आरसीसी बांधकाम सुरू केले असता, “तुमचे बांधकाम अनधिकृत असून ते मी होऊ देणार नाही. जर ते करायचे असेल तर मला १ लाख रूपये द्या, मी प्राधिकरणात तक्रार करणार नाही.” असे बोलून युवराज दाखले यांनी वेळोवेळी पैशाची मागणी केली. तसेच वारंवार पैशासाठी फोन करून दमकी दिली.

दरम्यान, घर बांधण्यासाठी कोणता अडथळा नको म्हणून भीतीपोटी तडजोड करून देसाई यांनी ३०,००० व विश्वकर्मा यांनी ३०,००० रूपये अशी रोख रक्कम दाखले यांना दिली. मात्र, दाखले यांनी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात तक्रार दिली. त्यामुळे तक्रारदारांचे घर पाडण्यात आले. अशा गोरगरिबांना धमकावून ब्लॅकमेल करणारे युवराज दाखले व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी. असे तक्रारीत म्हटले आहे.