शस्त्र, दारूगोळ्याशेजारी भरते महापालिका शाळा, विद्यार्थी व शिक्षकांत भितीचे वातावरण

0
505

पिंपरी, ता. २९ : निगडीतील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अंकुश बोऱ्हाडे विद्यालय व विद्यानिकेतन मुले व मुली शाळेमधील वर्ग खोल्यात पोलिस आयुक्तालयातील दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा साठा ठेवला आहे. याच दारूगोळ्या शेजारील खोलीत वर्ग भरत असून त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांत भितीचे वातावरण पसरले आहे. या शाळेत २६७ विद्यार्थी शिक्षण घेतात.  

नागरी वस्तीने वेढलेल्या निगडी परिसरात पोलिस मुख्यालय आहे. फेब्रुवारीमध्ये आयुक्तालयाने मुख्यालय आणि राखीव पोलिस निरीक्षक कार्यालयासाठी महापालिकेच्या भूमी व जिंदगी विभागाकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार निगडीतील बोऱ्हाडे विद्यालयाच्या इमारतीतील नऊ खोल्या व लगतचे मैदान तात्पुरते देण्यात आले. त्यासाठी दरमहा एक लाख ३८ हजार रुपये भाडे आकारले जात आहे. गेल्या सात महिन्यांपासून मुख्यालयाचा कारभार येथूनच सुरू आहे.

मुख्यालयात एप्रिल महिन्यात दारूगोळा व शस्त्रसाठा आणला. सुरवातीला दुसऱ्या मजल्यावर हा साठा ठेवला होता. परंतु, इमारत ३० वर्षे जुनी असून कधीही कोसळू शकते, हे पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी आयुक्तांना लेखी कळवून तो साठा तळमजल्यावर हलविण्यात आला. नेमका त्याच तळमजल्यावर बालवाडीचे दोन आणि पाचवी वर्ग भरविले जातात. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या सात महिन्यांत दारूगोळा किंवा शस्त्रांचा वापर केलेला नाही. खोलीत तो सीलबंद ठेवला असून सध्या सशस्त्र पोलिसांचा पहारा आहे. तरीही शाळा परिसरात अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रास्त्र ठेवणे चुकीचे असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते, असे मुख्याध्यापिका माणिक किरवे यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी तत्काळ शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे. वीस फुटांच्या अंतरावर विद्यार्थी शिकत असल्याने अशाप्रकारे दारूगोळा व शस्त्रसाठा ठेवण्याची परवानगी दिली आहे, अशी शिक्षण विभागाने भूमी व जिंदगी विभागाकडे विचारणा केली आहे. मात्र, आम्ही अशी कोणतीच परवानगी दिली नसल्याचे स्पष्टीकरण भूमी व जिंदगीने दिले. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पोलिस आयुक्‍त आर. के. पद्‌मनाभन यांना दारूगोळा इतरत्र हलवावा, असे पत्र दिले असल्याची माहिती भूमी व जिंदगी विभागाचे प्रशासन अधिकारी मुकेश कोळप यांनी दिली.

दरम्यान, मुख्याध्यापिकेच्या तक्रारीनुसार शाळेमध्ये २२ टन दारूगोळा व इतर शस्त्रसाठा ठेवल्याची माहिती होती. परंतु, मुख्यालयात नवीन शस्त्र व दारूगोळा अंदाजे १० टन असल्याची माहिती पोलिस आयुक्तालयास कळविली होती. त्यामुळे इमारतीतील तळ मजल्यावरील तीन खोल्यांचा ताबाही मिळावा, अशी मागणी राखीव पोलिस निरीक्षक जी. एस. गजगे यांनी अप्पर पोलिस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

याबाबत पोलिस मुख्यालयाचे राखीव पोलिस निरीक्षक जी. एस. गजगे म्हणाले, हा दारूगोळा स्फोटक नसल्याने विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकत नाही. याठिकाणी पोलिसांचा पहारा असल्याने कुठली दुर्घटनादेखील घडणार नाही.