गणित विधानसभेचे : माजी आमदार अण्णा बनसोडे यांना झालयं तरी काय?

0
1340

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी विधानसभा मतदार संघातून प्रथमच राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडून आलेले माजी आमदार अण्णा बनसोडे यंदाही विधानसभेसाठी इच्छुक असल्याने त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. मात्र, यावेळी त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाच्या चिन्हाचा किंबहूना नेत्याचा वापर न करता जोरदार मोर्चे बांधणी सुरु केली आहे. दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिलेली असताना, बनसोडे यांनी हा सावधपवित्रा नेमका कशासाठी घेतलाय? की राष्ट्रवादीला फारकत देऊन भाजप-शिवसेनेच्या वाटेवर आहेत. असे तर्क-वितर्क लावले जात असून अण्णा बनसोडे यांना झालयं तरी काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनसोडे यांनी रिक्षांवर पत्रके, सोशल मीडिया आदी ठिकाणी प्रचाराला सुरवात केली आहे. मात्र, त्यामध्ये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला व पक्षाच्या चिन्हाला स्थान दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पिंपरीत बनसोडे यांची कामगिरी असमाधानकारक झाल्याने पिंपरीत पार्थ पवार यांना पिछाडी मिळाली, असाही ठपका बनसोडे यांच्यावर ठेवला होता. आपल्याला यावेळी राष्ट्रवादी संधी देणार नाही, असा ग्रह बनसोडे यांना झाला असल्यानेच ते अपक्ष प्रचार करत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.

या उलट पिंपरी विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले शेखर ओव्हाळ यांनी मात्र, राष्ट्रवादीचे नेते व पक्षाच्या चिन्हासह प्रचार सुरू केला आहे. तसेच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेती देण्यास सुरूवात केली आहे.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत पिंपरीची निर्मिती झाली. तेव्हा हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बनसोडे यांना संधी देण्यात आली. मतदारांनी राष्ट्रवादीला पसंती दर्शविल्याने बनसोडे यांनी भाजपचे अमर साबळे यांचा १० हजार मतांनी पराभव केला.

तर २०१४ सालीही राष्ट्रवादीने पुन्हा बनसोडे यांनाच पुन्हा संधी दिली, पण यावेळी मतदारांनी शिवसेनेचे आयात उमेदवार ऍड. गौतम चाबुकस्वार यांच्या पारड्यात थोडे जास्त मते टाकल्याने २,३३५ मतांनी बनसोडे यांचा पराभव झाला. त्यात ४,४३५ मतदारांनी नोटाला पसंती दिली. तसेच भाजप-आरपीआय युतीच्या चंद्रकांता सोनकांबळे रिंगणात असल्याने मोठ्या प्रमाणावर मत विभागणी झाली आणि त्याचा फटका बनसोडे यांना बसला.

 

विधानसभा २००९

एकूण मतदार – १,४६,४६१

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ६१,०६१

अमर साबळे (भाजप) – ५१,५३४

चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय) – ११,१४६

—–

विधानसभा २०१४

एकूण मतदार – १,७६,९३३

ऍड. गौतम चाबुकस्वार (शिवसेना) – ५१,०९६

अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) – ४८,७६१

चंद्रकांता सोनकांबळे (आरपीआय) – ४७,२८८

नोटा – ४,४३५