भाजपासोबत जाण्यावरून ओमर आणि महबूबा यांच्यात भांडण

0
471

नवी दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – भाजपाला जम्मू-काश्मीरच्या राजकारणात शिरकाव करू देण्याच्या मुद्द्यांवरून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती यांच्यात भांडण सुरू आहे. हे दोघेही गेल्या आठवड्यापासून नजरकैदेत आहेत. त्यांना हरि निवास महल येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. मात्र त्यांच्यातले भांडण विकोपाला गेल्याने ओमर अब्दुल्ला यांना तेथून दुसरीकडे हलवण्यात आले आहे.

काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवण्याच्या आधीपासून ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांना हरि निवास महल येथे स्थानबद्ध करण्यात आले होते. हरि निवास महलच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपाला काश्मीरच्या राजकारणात प्रस्थापित करण्याच्या मुद्द्यावरून त्या दोघांमधे भांडण सुरू आहे. यासाठी दोघेही एकमेकांना जबाबदार ठरवत आहेत.

ओमर अब्दुल्ला यांचा आरोप आहे की महबूबा यांचे वडील दिवंगत मुफ्ती मोहम्मद सईद यांनी २०१५ आणि २०१८ मध्ये सत्तेसाठी भाजपाशी हातमिळवणी केली होती. याला उत्तर देताना महबूबाने ओमर अब्दुल्ला यांना आठवण करून दिली की, अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमधे मंत्री होते.

यावरून झालेल्या भांडणात दोघांचेही आवाज इतके चढले की यापुढे या दोघांना एकाच ठिकाणी ठेवणे योग्य नाही असा निर्णय घेण्यात आला. ओमर अब्दुल्ला यांना महादेव पहाडीजवळ चष्माशाही येथे वन विभाग भवनात हलवण्यात आले आहे. हरि निवासात दोघांची निवास व्यवस्था वेगवेगळ्या मजल्यांवर होती हे उल्लेखनीय.