विकासकामांचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीला लगीनघाई; जिजामाता मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाचे केले उद्घाटन

0
587

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – जिजामाता मल्टीस्पेशालीटी रूग्णालयातील अनेक कामे बाकी असताना राष्ट्रवादीच्या वतीने आज रूग्णालयाचेे उद्धाटन करण्यात आले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या कार्यकाळातील मंजूर विकासकामाचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीने लगीनघाई सुरू केली असून उद्घाटन करून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संयोग वाघेरे यांनी अकलेचे तारे तोडल्याचा आरोप भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केला आहे. तर राष्ट्रवादीच्या काळातील विकासकामांचे उद्धाटन करण्यात काहीच चुकीचे नाही. असे संजोग वाघेरे यांचे म्हणणे आहे.

जिजामाता रूग्णालयाबरोबरच प्रभाग क्रमांक २१ मधील काळभैरवनाथ मंदिर जिर्णोद्धाराचे भुमिपुजन, छत्रपती शिवाजी महाराज व शहीद हेमू कलानी पुतळ्याचे उद्धाटन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. ही सर्व कामे महापालिकेच्या खर्चातून करण्यात आली आहेत. या प्रभागाचे नेतृत्व चार नगरसेवक करीत असताना संजोग वाघेरे यांच्या पत्नी नगरसेविका उषा वाघेरे यांनी स्वतःच्याच नावाने प्रसिद्धीपत्रक व फ्लेक्स लावून उद्घाटन केले. त्यामुळे पॅनलमधील अन्य तीन नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी याविरोधात जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘संजोग वाघेरे हे माजी महापौर आहेत. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ते शहराध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे यांची ही तिसरी ‘टर्म’ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ता काळात स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळूनही त्यांना प्रभागाचा विकास साधता आला नाही. मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात आपण काळभैरवनाथ चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्राँझ मधील सिंहसनाधिस्त पुतळा उभारणे व त्यावर मेघडंबरी लावण्यासाठी पाठपुरावा केला. यापूर्वी सुनीता वाघेरे यांनी २०१२ साली पुतळा सुशोभिकरणाची मागणी केली होती. पुतळ्याच्या सुशोभिकरणाची ५० लाख रुपयांची निविदा २०१३ साली महापालिकेने मंजूर केली. मात्र वाघेरे यांनी हे काम त्यांच्याच ठेकेदाराला मिळवून देत त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर खर्च करण्याऐवजी भिकू वाघेरे यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी ४७ लाख रुपयांचा खर्च केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम गेली पाच वर्षे रेंगाळले होते. ते आपण पाठपुरावा करून पूर्ण केले.

हेमू कलानी उद्यानामध्ये शहीद हेमू कलानी यांचा पुतळा उभारण्याची सिंधी समाज बांधवांची गेली अनेक वर्षांपासूनची मागणी होती. सिंधी बांधवांनी यासाठी २००६ मध्ये पालिकेशी पत्र व्यवहार केला. मात्र नगरसेवक या नात्याने उषा वाघेरे हे काम यशस्वी करू शकल्या नाहीत. तब्बल ११ वर्षे हे काम झाले रेंगाळले. नगरसेवक झाल्यानंतर पत्रव्यवहार करून कलानी यांच्या पुतळ्याचा विषय मार्गी लावला’ असे संदीप वाघेरे यांनी म्हटले आहे.

जिजामाता रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन करण्याबाबत अनेकदा आपण मागणी केली. फर्निचरच्या कामाचा विषय मी स्वत: मंजूर करून घेतला. संजोग वाघेरे व उषा वाघेरे ‘आयत्या पीठावर रेघोट्या’ मारण्यासाठी सरसावले आहेत. ज्यांना सत्ता असताना विकासकामे करण्यात यश आले नाही, ती सर्व कामे आम्ही करून घेतली. मात्र स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधत उद्घाटनाचा चालविलेला प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची टीका संदीप वाघेरे यांनी केली आहे.

वाघेरे यांनी पुढे म्हटले आहे की, पिंपरी गावातील काळभैरवनाथ मंदिराच्या दुरुस्तीचे काम संजोग वाघेरे यांनी मंजूर करून घेतले होते. गावातील नागरिकांची मागणी हे मंदिर नव्याने उभारण्याची होती. हे मंदिर नव्याने उभारण्याची मागणी आपण मंजूर करून घेतली. त्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. मंदिराच्या बांधकामाचा खर्च महापालिका करणार असून कळसाच्या कामाचा खर्च आपण स्वत: करणार आहोत. असे असतानाही या मंदिराच्या कामाचे उद्घाटन संजोग वाघेरे हे आपल्या वाढदिवसाच्या दिवशी करून श्रेय लाटत असल्याचा आरोपही संदीप वाघेरे यांनी केला आहे.

उद्धाटन करण्यात चुकीचे काय

महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता असताना मंजुर केलेल्या विकास कामांची आत्ता अंमलबजावणी झाली आहे. या विकासकामांचे उद्धाटन करण्यात काहीच गैर नाही. मात्र, भाजपच्या लोकप्रतिनिधींना ते चुकीचे वाटत आहे. जिजामाता रूग्णालयातील फक्त ओपीडी विभागाचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संयोग वाघेरे यांचे म्हणणे आहे.