MPSC पास झालेल्या ८०० विद्यार्थ्यांना नारळ; सेवेत दाखल होण्यापुर्वीच नियुक्ती रद्द

0
512

मुंबई, दि. ३ (पीसीबी) – राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे MPSC मध्ये पास झालेल्या ८०० हून अधिक मुलांना सेवेत दाखल होण्यापूर्वीच नारळ मिळाला आहे.  राज्य स्पर्धा परीक्षा मंडळामार्फत गेल्यावर्षी घेतलेल्या परिवहन निरीक्षक पदाच्या निवडी नागपूर खंडपीठाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीचे स्वप्न सत्यात उतरण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या ८३३ यशस्वी विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. या विद्यार्थ्यांवर सरकारच्या भोंगळ कारभारामुळे वैफल्यात जायची वेळ आली असून, हातातील नोकऱ्या सोडून घरी बसलेल्या या तरुणांचे आता आभाळच फाटले आहे.

राज्यातील परिवहन विभागात उच्चशिक्षीत तरुणांनी यावे, यासाठी राज्य सरकारने २०१६ मध्ये जीआर काढून परीक्षा पात्रतेच्या अटी शिथिल केल्या होत्या. त्याबाबतची माहिती राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांना देण्यात आली होती. त्यानुसार २९ जानेवारी २०१७ रोजी या परीक्षेची जाहिरात देखील आली. तब्बल चार वर्षांनी आरटीओ परीक्षेची जाहिरात आल्याने राज्यातील ७० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले. एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेत यातील १० हजार विद्यार्थ्यांची निवड झाली. यानंतर हे तरुण नोकऱ्या सोडून या अंतिम परिक्षेच्या अभ्यासाला लागली.

मुख्य परीक्षा ६ ऑगस्ट २०१७ रोजी घेण्यात आली आणि याचा निकाल ३१ मार्च २०१८ रोजी झाला. परीक्षा दिलेल्या १० हजार विद्यार्थ्यातून ८३३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी विद्यार्थ्यांना निवडीचे पत्रही देण्यात आले आहे. निवडीची पत्रं मिळाल्याने गावोगावी यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळे रंगले. तब्बल ७० हजार विद्यार्थ्यांतून निवड होत, आरटीओची सरकारी नोकरी पक्की झाल्याने यशस्वी विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. कुटुंबीयही अभिमाने मुलांच्या यशाचं कौतुक करत होते.

याच काळात १४ जून २०१८ रोजी या मुलांना कागदपत्रे तपासणीसाठी येण्याबाबत कळविण्यात आले. हे सर्व यशस्वी विद्यार्थी कागदपत्रे घेऊन जाणार, तेवढ्यात त्यांना या निवडीवर न्यायालयाकडून स्थगिती आल्याने, निवड प्रक्रिया थांबवण्यात आल्याचे पत्र आले.