आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे यांना भाजपची उमेदवारी जाहीर

0
827

पिंपरी, दि. १ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप तर भोसरीतून आमदार महेश लांडगे यांना भाजपने पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युती झाल्यास भोसरी शिवसेनेकडे जाईल, या चर्चेला पुर्णविराम मिळाला असून शिवसेनेकडून इच्छुक असलेल्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.

चिंचवडमधून आमदार जगताप यांच्यासह राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन इच्छुक होते. मात्र, आमदार जगताप यांनाच उमेदवारी निश्चित असल्याचे या अगोदरच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सुतोवाच केले होते.

मात्र, भोसरी विधानसभा हा मतदार संघ २००९ मध्ये शिवसेनेकडे होता. मात्र, २०१४ मध्ये दोन्ही पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. परंतू, अपक्ष उमेदवार महेश लांडगे यांच्या बाजूने मतदारांनी कौल दिला. त्यानंतर आमदार लांडगे यांनी भाजपची कास धरत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी दोन्ही पक्षांनी विधानसभेसाठी युतीची तयारी दर्शविल्याने भोसरीवर शिवसेनेच्या वतीने दावा करण्यात आला. शिवसेना इच्छुकांनी जोरदार प्रचारही सुरू केला. मात्र, युतीच्या वाटाघाटीत भाजपने भोसरी स्वता:कडे घेत विद्यमान आमदार महेश लांडगे यांनाच पुन्हा संधी दिली.

तरीही लांडगेच असते उमेदवार

युतीच्या वाटाघाटीत जर भोसरी मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असता, तर आमदार लांडगे यांचा शिवसेनेत प्रवेश करून त्यांनाच शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार म्हणून जाहीर केले असते. असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.