#MeToo मुळे साजिद सोबत काम करण्यास नकार; हाऊसफुल ४’चे शूटिंग रद्द करण्याची अक्षयची मागणी

0
927

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – दिग्दर्शक साजिद खानवर झालेल्या गंभीर आरोपानंतर अभिनेता अक्षय कुमारने साजिद खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. साजिदच्या ‘हाऊसफुल ४’ चित्रपटाचे चित्रीकरण तातडीने रद्द करण्यात यावे, अशी मागणी अक्षयने ट्विट करून चित्रपटाच्या निर्मात्यांकडे केली आहे.

अक्षय भूमिका साकारत असलेल्या हाऊसफुल ४ चा दिग्दर्शक साजिद खान आणि याच चित्रपटात काम करणाऱ्या नाना पाटेकर या दोघांवरही लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप आहेत. मनोरंजन विश्वात काम करणारी महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी साजिदवर केलेल्या गंभीर आरोपांची दखल अक्षयने घेत चित्रीकरण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षयनं ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. ‘ मी देशाबाहेर होतो. परतल्यानंतर मला काही अस्वस्थ करून टाकणाऱ्या बातम्या ऐकायला मिळाल्या. म्हणूनच मी हाऊसफुल ४च्या निर्मात्यांना चित्रीकरण थांबवण्याची विनंती केली आहे. ही अत्यंत गंभीर बाब आहे, त्यामुळे अशा प्रकरणात कडक कारवाई होणे गरजेचे आहे. ज्यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप आहेत त्यांच्यासोबत मी काम करणार नाही. या प्रकरणात ज्या पीडित महिला आहेत त्यांना न्याय मिळालाच पाहिजे’, असे अक्षयने ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे.

यापूर्वी तनुश्री दत्ताने अक्षय कुमारने नाना पाटेकर सारख्या महिलांशी गैरवर्तणुक करणाऱ्या व्यक्तींसोबत काम करणे थांबवले पाहिजे, असेही म्हटले होते. अक्षयपूर्वी आमिर खान यानंदेखील दिग्दर्शक सुभाष कपूर सोबत काम करायला नकार दिला. सुभाष कपूर आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या ‘मोगुल’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते. पण त्यांच्यावर असलेल्या लैंगिक छळाच्या आरोपानंतर आमिरने त्यांच्यासोबत काम करायला नकार दिला आहे.