#MeToo प्रकरणात एम. जे अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल- अमित शाह

363

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी)- #MeToo प्रकरणात परराष्ट्र राज्यमंत्री आणि माजी पत्रकार एम. जे अकबर यांच्यावर अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी आता भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी लक्ष घातले असून अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे. एम. जे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे ते पाहणे आवश्यक आहे असेही त्यांनी म्हटले आहे. अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर अमित शाह यांनी पहिल्यांदाच मौन सोडले आहे. याआधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम. जे. अकबर यांनीच या विषयावर मौन सोडावे आणि आरोपांना उत्तर द्यावे असे म्हटले होते

वीस वर्षांपूर्वी पत्रकारितेमध्ये ऐन भरात असताना अकबर यांनी अनेक तरूण महिला पत्रकारांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप होत आहे. या सगळ्यात अकबर यांना विरोध करून नोकरी सोडलेल्या अनेक पत्रकार महिला पुढे आल्या असल्या तरी तेवढे धैर्य न दाखवणाऱ्या व बळी पडलेल्या अनेकजणी असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. असे आरोप झालेली व्यक्ती राज्यमंत्रीपदावर कशी काय राहू शकते असा आरोप करत काँग्रेसनेही भाजपावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. आता अमित शाह यांनी चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अभिनेत्री तनुश्री दत्ताने अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. ज्यानंतर हिंदी चित्रपसृष्टी, प्रसारमाध्यमे आणि राजकीय क्षेत्रांमध्ये #MeToo ची चांगलीच चर्चा झाली आणि अनेक महिलांनी पुढे येत त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. याच मोहिमे अंतर्गत एम. जे अकबर यांच्यावरही अनेक महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

.