#MeToo ची लाट पुण्यातील सिम्बायोसिसमध्ये; आजी-माजी विद्यार्थ्यांचा लैंगिक शोषणाचा आरोप

0
787

पुणे, दि. १० (पीसीबी) – सध्या देशाभरात महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत #MeToo या मोहिमेने वाचा फोडली असून हि लाट आता पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये येऊन धडकली आहे. सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधूनही (एससीएमसी) लैंगिक शोषणाबाबतचे प्रकार समोर आले आहेत. या महाविद्यालयांतील काही आजी आणि माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थी आणि प्राध्यापकांविरोधात समाजमाध्यमांमध्ये लिहिले असून, या प्रकारांबाबत तक्रारी करूनही कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.

सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशन विमाननगर येथे आहे. या महाविद्यालयांतील १० पेक्षा अधिक विद्यार्थिनींनी, विशेषत माजी विद्यार्थिनींनी ६ ऑक्टोबरपासून समाजमाध्यमांद्वारे त्यांच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकारांविषयी व्यक्त होण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या नावांचाही उल्लेख केला. तसेच लैंगिक शोषणाबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही काहीच कारवाई झाली नसल्याचा आरोपही विद्यार्थिनींनी आपल्या पोस्टमधून केला.

समाजमाध्यमांमध्ये होत असलेल्या प्रकाराची दखल घेत सिम्बायोसिस प्रशासनाने ८ ऑक्टोबरला एससीएमसीच्या फेसबुक पेजवर ‘ओपन लेटर’ लिहून माफी मागितली. तसेच महाविद्यालयातील सध्याच्या आणि माजी विद्यार्थिनींना पुढे येऊन अंतर्गत तक्रार समितीकडे तक्रारी नोंदवण्याचे, सुधारणेसाठी सूचना करण्याचे आवाहन करत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.