Desh

IIT मध्ये नोकऱ्यांत ३० टक्केची घट

By PCB Author

December 19, 2023

नवी दिल्ली, दि. १९ (पीसीबी) – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये नोकऱ्यांमध्ये घट झाली आहे. यंदा विविध कंपन्या आयआयटीमध्ये आल्या. परंतु त्यांच्याकडील नोकरीच्या ऑफर ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. जुन्या आयआयटी दिल्ली, बॉम्बे, कानपूर, मद्रास, खरगपूर, रुरकी, गुवाहाटी आणि वाराणसी (बीएचयू) या धक्कादायक ट्रेंडमुळे अडचणीत आहेत. या वर्षासाठी अंतिम प्लेसमेंट सुरू होऊन एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अद्यापही नोकरीची चिंता सतावते आहे. बरीच तयारी करूनही प्लेसमेंट टीम सदस्यांच्या मते, गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरीच्या ऑफर १५ ते ३० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत.

कॉम्प्युटर सायन्ससारख्या अभ्यासक्रमातही नोकऱ्या नाहीतआश्‍चर्यकारक बाब म्हणजे कॉम्प्युटर सायन्ससारख्या अभ्यासक्रमातही नोकऱ्या कमी होत आहेत. आठवडा उलटला तरी अजूनही अनेक विद्यार्थ्यांच्या हातात नोकऱ्या नाहीत. गेल्या काही वर्षांपासून कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना अवघ्या तीन ते चार दिवसांत नोकऱ्या मिळाल्या.

जुन्या आयआयटी या ट्रेंडमुळे आश्चर्यचकित होतात, कारण दरवर्षी या संस्था संपूर्ण देशासाठी प्लेसमेंट मानके ठरवतात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या प्रतिष्ठित संस्थांमध्ये जाण्यासाठी कठोर संघर्ष करतात, जेणेकरून त्यांना चांगल्या नोकऱ्या आणि चांगले जीवन मिळावे.

गेल्या वर्षी प्लेसमेंटच्या काळातच टेक मंदी दिसू लागली. यंदा त्यात आणखी वाढ झाली आहे. भरती करणारे कमी मुलांना कामावर घेत आहेत. तसेच अनेक मोठ्या कंपन्या अद्याप प्लेसमेंटसाठी पुढे आलेल्या नाहीत. कंपन्यांमध्ये नियुक्तीबाबत फारसा उत्साह नाही.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जिथे गेल्या वर्षी कंपन्या ८ ते १० मुलांना नोकऱ्या देत होत्या, आता फक्त १ ते २ विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या देत आहेत. आयआयटीमध्ये अंतिम प्लेसमेंट सत्र १ डिसेंबरपासून सुरू झाले. प्लेसमेंट सेल आता अधिक कंपन्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत IIT खरगपूरला फक्त ११८१ ऑफर मिळाल्या आहेत आणि IIT BHU ला फक्त ८५० ऑफर मिळाल्या आहेत.