पिंपरीगावातील क्रिडांगण झाले दारूड्यांचा अड्डा, भटक्या जनावरांचे आश्रयस्थान; प्रशासन व लोकप्रतिनिधी झोपलेत का?

0
627

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरीगावातील महात्मा फुले महाविद्यालयासमोर असलेले महापालिकेचे क्रिडांगण दारूड्यांचा अड्डा झाले असून क्रिडांगणावर सर्वत्र दारूच्या बाटल्यांच्या काचा पसरल्या आहेत. तसेच या ठिकाणी भटक्या जनावरांचे आश्रयस्थान झाले आहे. परिणामी क्रिडांगणावर येणाऱ्या लहान मुलांसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे लोकप्रतिनीधी, महापालिका व पोलिस प्रशासन झोपले आहे का? असा संतप्त संवाल नागरिक विचारत आहेत.

या क्रिडांगणावर पिंपरी, रहाटणी, काळेवाडी परिसरातून अनेक मुल-मुली विविध खेळांचा, सैन्य दल व पोलिस भर्तीचा सराव करण्यासाठी येतात. तर नागरिकही व्यायामासाठी येत असतात. मात्र, महापालिका व स्थानिक लोकप्रितिनीधींच्या दुर्लक्षामुळे क्रिडांगणाची दुरवस्था झाली आहे. मैदानावर मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ठिकठिकाणी खाचखलगे तयार झाले आहेत. तर दिवेही बंद आहेत.

क्रिडांगणाच्या इमारतीत आरोग्य विभागाचे कार्यालय असूनही परिसरात घाण पसरलेली असते. त्यामुळे कामचुकार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दारूड्यांना आवरा

क्रिडांगणाच्या पायऱ्यावर दारूडे दारू पिण्यास बसत असून दारूच्या बाटल्या क्रिडांगणावरच फोडतात. त्यामुळे परिसरात काचा पसरल्या असून अनेकांना इजा झाली आहे. तसेच दारूड्यांत अनेकदा भांडणेही होतात, काही वर्षापुर्वी या परिसरात एकाचा खुनही झाला होता. या ठिकाणी बसणाऱ्या दारूड्यांना कोणाचीच भीती नसून पोलिस प्रशासन व लोकप्रतिनीधींमध्ये असे प्रकार थांबवण्याची धमक नाही का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

नगरसदस्यांनी इकडे लक्ष द्यावे

महापालिका हद्दीत प्राणी पाळण्यास बंदी असते. मात्र, क्रिडांगणावर भटक्या जनावरांचा मोठा वापर असतो. अनेकदा या जनावरांत टकरीही लागतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. महापालिका व स्थानिक नगरसदस्य याकडे डोळेझाक करत असून एका नगरसदस्याचे घर व कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. स्वता:ला कार्यक्षम समजणाऱ्या नगरसदस्यांनी क्रिडांगणाकडे लक्ष दिल्यास नागरिकांना तुम्हाला निवडून दिल्याचा पश्च्याताप होणार नाही. असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.