Desh

श्रीमंतांच्या यादीतील स्थानाला…, एका अहवालाने हदरवले गौतम अदानी यांचे साम्राज्य

By PCB Author

January 28, 2023

नवी दिल्ली, दि .२८ (पीसीबी) : अमेरिकेतील नावाजलेली गुंतवणूक संशोधन संस्था हिंडनबर्गच्या एका अहवालाने सध्या धुमाकूळ घातला आहे. जगभरात या अहवालाची चर्चा आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि भारतीय उद्योजक गौतम अदानी यांना या अहवालाचा हादरा बसला आहे. या अहवालात अदानी समूहावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. त्यानुसार, समूहाने शेअर्समध्ये फेरपार केली आणि लेखा परिक्षणात गडबडीचा आरोप करण्यात आला आहे. अर्थात या अहवालाने अदानी समूहाची चिंता वाढवली. अदानी समूहाने अहवालातील आरोप फेटाळले आणि कायदेशीर कार्यवाहीची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे. पण तोपर्यंत या अहवालाने मोठे नुकसान केले आहे. फोर्ब्स बिलेनियर्स इंडेक्स नुसार, अदानी यांच्या संपत्तीत गेल्या 24 तासात 17.38 टक्क्यांची घसरण झाली.

या अहवालानंतर अदानी यांच्या एकूण संपत्तीत एकाच दिवसात जवळपास 20 अब्ज डॉलरचे (1 लाख 60 हजार कोटी रुपये) नुकसान झाले आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 98.5 अब्ज डॉलर झाली आहे. श्रीमंतांच्या यादीतील त्यांच्या स्थानावर याचा परिणाम झाला आहे.

श्रीमंतांच्या यादीत गौतम अदानी यांच्या स्थानात काही दिवसांपूर्वी घसरण झाली होती. ते चौथ्या स्थानावर होते. पण अहवालानंतर चौथ्या स्थानावरुन ते सातव्या स्थानावर आल्याचा दावा करण्यात येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर अदानी यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या खाली आली आहे.

अदानी 7 व्या स्थानी आले आहेत. तर बिल गेट्स 6 व्या स्थानी, वॉरेन बफेट 5 व्या, लॅरी एलिसन चौथ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या स्थानावर अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस, दुसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क तर पहिल्या स्थानावर बर्नार्ड अरनॉल्ट हे आहेत.

बाजारात अदानी एंटरप्रायझेसचा FPO आज, 27 जानेवारी 2023 रोजी दाखल झाला. हा 3,112 ते 3,276 रुपयांच्या प्राइस बँडवर विक्री करण्याची योजना आहे. एफपीओच्या अगोदरच एंकर गुंतवणूकदारांकडून 5,985 कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.

गौतम अदानी, भारतातील सर्वात मोठ्या बंदर विकास आणि नियंत्रण समूहाचे संस्थापक आहेत. मार्च 2022 मध्ये शेअर बाजाराला दिलेल्या सूचनेनुसार, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी ट्रान्समिशनमद्ये त्यांच्याकडे 75% हिस्सा आहे.

अदानी एकूण गॅसमध्ये 37%, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनचा 65% आणि अदानी ग्रीन एनर्जीमध्ये त्यांच्याकडे 61% हिस्सा आहे.आता आरोपानंतर अदानी समूह यूएस आणि भारतीय कायद्यांतर्गत संबंधित तरतुदींचे मूल्यांकन करत आहे. समूह याविषयीची कायदेशीर कारवाई करणार आहे.