Pimpri

राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांची बंडखोरी, शुक़्रवारी भरणार अपक्ष अर्ज

By PCB Author

October 03, 2019

पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – “पिंपरी राखीव मतदारसंघातून मागील निवडणुकीत मी अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झालो. त्यानंतर देखील सलग पाच वर्ष मी मतदारांशी संपर्कात राहून माझे काम सुरु ठेवले आहे. या निवडणुकीत देखील मला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याची खात्री होती. परंतू, मला का डावलले? याबाबत मीच स्वत: चकीत झालो आहे. ‘माझे काय चुकले’ हाच प्रश्न मी राष्ट्रवादीच्या पक्षनेतृत्वास विचारत आहे.” असे  राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांनी चिंचवड स्टेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

बनसोडे म्हणाले की, “शुक्रवारी सकाळी १० वाजता आकुर्डी खंडोबामाळ चौकातून आपल्या हजारो समर्थकांसह बनसोडे अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्यास जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मी पार्थ पवारांचे काम प्रामाणिकपणे केले होते. त्याचे बक्षीस म्हणूनच मला डावलले काय? असे वाटते. या विधानसभा निवडणुकीत माझ्याबरोबर पक्षातील व विरोधी पक्षातीलही अनेक नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार आहेत. त्यांच्या पाठींब्यावरच मी निवडणुकीस उभा राहत आहे.”

आपण माघार घेणार नाही ना? असे विचारले असता “समजावण्याची वेळ आता गेली आहे. मी अर्ज भरणार आहे, कोण सक्षम हे कळेलच. मी अजूनही ग्रासरूटलाच काम करीत आहे. मला शंभर टक्के विजयाची खात्री आहे. आपल्याबरोबर किती नगरसेवक आहेत असे विचारले असता, ते उद्या तुम्हाला रॅलीत दिसेल.” असेही बनसोडे म्हणाले.