सफारी पार्कमुळे समाविष्ट गावांचा होणार कायापालट – वसंत लोंढे

707

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – मोशी आरक्षित जागेवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा कायापालट होणार असून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंत लोंढे यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित बैठकीत बोलत होते.

यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बो-हाडे, नगरसेवक वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सारीका बो-हाडे, अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, माजी नगरसेवक बबन बोराटे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, ज्येष्ठ नेते काळूराम सस्ते, प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे आदी उपस्थित होते.

यावेळी लोंढे म्हणाले की, “आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क व्हावे यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यास मान्यता दिली. या पार्कसाठी सुमारे 1500 ते 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पर्यटन विभाग (एमटीडीसी) माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरीत निधी पिंपरी चिंचवड महापालिका उभारणार आहे. तीन वर्षात हे सफारी पार्क साकारणार आहे. महापालिका आणि पर्यटन विभाग (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येणार आहे. शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल.” देशात हा प्रकल्प राबविणारे हे पहिले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर होणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.

लोंढे म्हणाले की, मोशी येथील शासकीय गायरान जागेवर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातील सफारी पार्कची आरक्षित जागा तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे. सेन्टॉसा पार्क सिंगापूरच्या धर्तीवर सफारी पार्क साकारण्यात यावा यासाठी तातडीने एमटीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाईल, असे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले आहे. सफारी पार्कचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तातडीने सादर करावा. त्याला लवकरात लवकर मान्यता देण्यात येईल. त्यानंतर सफारी पार्क साकारण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, च-होली भागाचा विकास झपाट्याने होत आहे. आमदार महेश लांडगे यांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजीवनी देण्याचे व्हिजन ठेवले आहे. त्यादृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून या गावांच्या पायाभूत सोयी सुविधांकडे दुर्लक्ष झाले होते. मात्र, आमदार लांडगे यांनी चिखली, मोशी, च-होली आदी भागात महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतल्याने या भागात विकासाची गंगा आली आहे. मोशी येथे होणा-या सफारी पार्कमुळे या भागातील उद्योग व्यवसायाची वृद्धी होईल. स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही लोंढे यांनी सांगितले.