पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटला ‘कायाकल्प-२०१९’ पुरस्कार प्रदान

0
458

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – राष्ट्रीय आरोग्य मिशन व भारतीय गुणवत्ता परिषद यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानाच्या सर्वेक्षणात पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल हॉस्पिटल व संशोधन केंद्र देशात सर्वोत्तम ठरले आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील ‘कायाकल्प २०१९’ हा पुरस्कार देऊन हॉस्पिटलचा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला.

संस्थेचे ट्रस्टी डॉ. यशराज पाटील, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी श्री अश्विनी कुमार चौबे राज्यमंत्री, आरोग्य व कुटुंब कल्याण,  प्रीती सुदान, सचिव – आरोग्य व कुटुंब कल्याण , डॉ. बी. के राव, अध्यक्ष एनएबीएच व इतर मान्यवर उपस्थित होते.   

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यावर्षी प्रथमच कायाकल्प पुरस्कार स्पर्धेसाठी देशातील ६५३ खाजगी रुग्णालयांचाही सर्वेक्षणास सहभाग केला होता. रुग्णसेवेचा दर्जा, स्वच्छता, देखभाल, संसर्ग नियंत्रण, जैविक कचर्याचे व्यवस्थापन, निर्जंतुकीकरण प्रक्रिया, स्वच्छता जनजागृती, आदी प्रमुख घटकांचा सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. यात डॉ. डी.वाय. पाटील हॉस्पिटलने  सर्वाधिक गुण प्राप्त केले व   सर्वेक्षणात देशात  प्रथम क्रमांक मिळवला. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा सौ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, संचालक डॉ. स्मिता  जाधव, ट्रस्टी डॉ. यशराज पाटील,  यांच्या मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलने ही कामगिरी केली.

महाराष्ट्राचा बहुमान : डॉ. पी.डी. पाटील

“राष्ट्रीय पातळीवरचा देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळणे, हा फक्त आमच्या हॉस्पिटलचा बहुमान नसून महाराष्ट्राचा तसेच आमच्या पिंपरी-चिंचवड या उद्योगनगरीचाही बहुमान आहे. पिंपरीसारख्या उद्योगनगरीत जागतिक स्तरावरील सोयीसुविधांनी युक्त हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उभारण्याचे माझे स्वप्न होते. ते पूर्ण होतानाच राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. मी अजिबात अतिशयोक्ती न करता सांगतो की, या हॉस्पिटलला आजवर देश-विदेशातील असंख्य मान्यवरांनी भेट दिली आणि प्रत्येकजण येथील सुविधा पाहून थक्क झाला आहे. सध्याच्या काळात अतिशय भयावह आजार बळावले आहेत. सर्वसामान्य रुग्णांना त्यावरील उपचार अजिबात परवडणारे नाहीत. अशा काळात केंद्र व राज्य शासनाच्या रुग्णसेवेच्या सर्व योजना या हॉस्पिटलमध्ये राबविण्यात येतात. रुग्णांना सर्वाधिक सुविधा देणारे हे राज्यातील प्रथम क्रमांकाचे हॉस्पिटल आहे.”

जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलची २०१८ मध्ये गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. येथे अद्ययावत २००० बेड असून अतिदक्षता विभागात १७५ बेड आहेत. अत्यंत उच्च दर्जाचे ३० मॉड्युलर ऑपरेशन थिएटर तसेच १९ बाह्यरुग्ण विभाग आहेत. हॉस्पिटलमध्ये जागतिक स्तरावरील हायटेक रोबोटिक सेंटर आहे. हृदयरोग, कर्करोग, मेंदू विकार, हाडांचे विकार आदी गंभीर आजारांपासून जवळपास सर्व आजारांवर या ठिकाणी अद्ययावत उपचार केले जातात. येथील बालरुग्ण विभाग देशात सर्वोत्तम ठरावा. २ लाखांहून अधिक मोठ्या, ३ लाख छोट्या शस्त्रक्रिया, ७५ हजारांवर प्रसूती या हॉस्पिटलमध्ये झाल्या आहेत.