घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी सामान्यांकडून शुल्क आकारू नका; आमदार जगतापांची महापालिका आयुक्तांना सूचना

0
449

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घरासाठी महिन्याला ६० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांना वर्षाला ७२० रुपये द्यावे लागणार आहेत. हा निर्णय सामान्यांवर आर्थिक भार वाढविणारा आहे. त्यामुळे हा निर्णय रद्द करून सामान्यांकडून आकारण्यात येणारे शुल्क महापालिकेने स्वतःच्या उत्पन्नातून भरावे, अशी सूचना भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना पत्र दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे, “ शहरात दररोज निर्माण होणारा कचरा घरोघरी जाऊन गोळा केला जातो. त्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभी केली आहे. या यंत्रणेतही अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे कचरा समस्या पूर्णपणे सुटलेले नाही. यंत्रणेतील त्रुटी दूर करून शहरातील दररोजचा कचरा दररोज साफ होण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत प्रशासनाला वेळोवेळी सूचनाही करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक घराकडून महिन्याला ६० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्यांना महिन्याला ७२० रुपये महापालिकेला द्यावे लागणार आहेत.

हे शुल्क सामान्यांसाठी अन्यायकारक ठरणार आहे. हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना हे शुल्क परवडणारे नाही. महापालिकेने टाकलेला हा आर्थिक भार सामान्यांना परवडणारा नाही. त्यामुळे महापालिकेने घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या शुल्काचा भार सामान्यांच्या माथी मारता कामा नये. घरोघरचा कचरा गोळा करण्याच्या मोबदल्यात प्रत्येक घराकडून शुल्क आकारण्याऐवजी त्यापोटी जो काही खर्च येणार आहे तो महापालिकेने स्वतःच्या उत्पन्नातून खर्च करावे. या शुल्कातून सामान्य जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी केली आहे.”