Chinchwad

रहाटणी गावाचा नाना काटेंना आमदार करण्याचा निर्धार

By PCB Author

February 12, 2023

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या विकासकामांचा त्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. पिंपळे सौदागर आणि रहाटणी या दोन गावांमध्ये नाना काटे यांनी मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहे. याच कामांचा सन्मान म्हणून आधी पिंपळे सौदागर आणि आता रहाटणी या दोन गावांनी एकत्र येत नाना काटे यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे.

नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या पहिल्याच दिवशी पिंपळे सौदागरवासियांनी एकजुटीने नाना काटे यांच्या विजयाचा संकल्प केला. सौदागरवासियांच्या एकजुटीची स्वतः अजित पवारांनी स्तुती केली आहे. पिंपळे सौदागरवासियांनी आपल्या साठी अर्ध्या रात्री धावून येणाऱ्या नेत्याला आमदार करायचेच असा चंग बांधला आहे.

आता तोच कित्ता गिरवत रहाटणी या गावाने देखील नाना काटेंना आमदार करण्याचा निर्धार केला आहे. रहाटणी या गावात देखील नाना काटे यांचे भरीव काम आहे. रहाटणी येथील नागरिक थेट नाना काटे यांना काहीही अडचण असली तर हक्काने सांगतात. आणि नाना काटे देखील त्यांची मदत करतात. याच कारणाने सर्व गावकऱ्यांनी एकत्र नाना काटे हेच पुढील आमदार असतील हे ठरवून टाकले आहे.

रहाटणी गावाच्या एकजुटीचा नाना काटे यांना या निवडणुकीत मोठा फायदा होणार आहे. ज्या पद्धतीने नाना काटेंना मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळत आहे त्यावरून या निवडणुकीत नाना काटे यांनी मोठी आघाडी घेतलेली दिसून येत आहे.