Maharashtra

Corona Virus । मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू

By PCB Author

March 15, 2020

मुंबई,दि.१५(पीसीबी) – करोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदीचं कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे ३२ रुग्ण राज्यभरात आढळले आहेत. मुंबईत खबरदारीचा उपाय म्हणून जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. कोणीही पॅनिक होऊ नये. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मोठे समारंभ, गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे. तसेच पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलं. जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

३१ मार्चपर्यंत टूर्स आणि ट्रॅव्हल्सवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई दर्शनसह बिझनेस टूरही रद्द करण्यात आल्या आहेत.करोनाच प्रादुर्भाव टाळण्यासाठी आम्ही हा निर्णय़ घेतला आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नये आम्हाला सहकार्य करावं असं पोलिसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहखात्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.