Banner News

गणित विधानसभेचे : चिंचवडमध्ये होणार पिंपळे गुरव विरुद्ध वाकड सामना

By PCB Author

August 14, 2019

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – चिंचवड विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप विरुद्ध राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे किंवा शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टिकोनातून आमदार जगताप यांची जोरदार तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे मयूर कलाटे यांचीही उमेदवारी मिळविण्यासाठी धावपळ चालू केली आहे. मात्र, राहुल कलाटे हे भाजप-शिवसेनाची युती कधी होईल, या प्रतीक्षेत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

देशभरात मोदी लाट ओसरली, असा अनेकांचा गैरसमज होता. मात्र, जम्मू – काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याने मोदी लाटेला अजून मोठी भरती येण्याची शक्यता राजकीय अभ्यासकांकडून वर्तवली जात आहे. या लाटेचा महापूर महाराष्ट्रातील विधानसभेत वाहून निघू शकतो. त्याचीच मोठी धास्ती विरोधकांनी घेतली आहे. परिणामी भाजपच्या उमेदवारासमोर तोडीस तोड देणाऱ्या उमेदवारांची चाचपणी मोहीम सध्या विरोधी पक्षामध्ये सुरू आहे. परंतू विरोधी पक्षात प्रबळ दावेदार असणाऱ्या अनेकांनी निवडणुकी अगोदरच माघारी घेतल्याचे दिसत आहे.

चिंचवड विधानसभेतही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. दोन वेळा आमदारकी भुषविलेले विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी लढण्याची तयारी दर्शवली आहे. आपल्यालाच तिकीट मिळावे, यासाठी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन याचे सुतोवाच केले. यावेळी मात्र नवनिर्वाचित महापालिका विरोधी पक्षनेते नाना काटे हे चिंचवडमधून निवडणूक लढणार नसल्याची जोरदार चर्चा आहे.

शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे मात्र, भाजप-शिवसेना युती होण्याकडे नजर ठेवून आहेत. २०१४ विधानसभा निवडणूकीप्रमाणे शेवटच्या क्षणी युती तुटल्यास शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवायची, असे त्याचे ठरले असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, जर युती झाल्यास ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जगताप यांच्या विरोधात दंड थोपटायचे. अशीही त्यांनी रणनीती आखल्याची चर्चा कार्यकर्त्यांत रंगली आहे.

दरम्यान, राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात. शहरात भाजपसाठी वातावरण अनुकूल असले तरी आमदार जगताप यांनी साधव पावित्रा घेऊन जोरदार तयारीला लागले आहेत.