भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह

0
343

मुंबई, दि. १९ (पीसीबी) – विधानसभा निवडणुका आता काही आठवड्यांवर आल्या आहेत. भाजप – शिवसेना युतीचे भवितव्य काय असेल असा प्रश्न सध्या राजकीय जाणकारांना पडला आहे. निवडणूक प्रचार, वातावरणनिर्मितीमध्ये युती आघाडीवर आहे. असे असले तरी अद्यापही युतीचा फॉर्म्युला अद्याप निश्चित झालेला नाही. लोकसभा निवडणुका होण्याच्या काही दिवस आधी नाही म्हणता म्हणता शिवसेनेने भाजपसोबत युती केली. विधानसभा निवडणूकीचे बिगूल वाजल्य़ानंतर दोन्ही पक्षांनी वेगवेगळ्या यात्रा काढत लोकांमध्ये जाऊ लागले. या यात्रेदरम्यान विधानसभा निवडणूक युतीतच लढवणार असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असले तरी भाजप कार्यकर्त्यांऩी मात्र, भाजपने स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरला आहे.

एका वृत्तपत्राने केलेल्या सर्वेत हे आढळून आले. लोकसभा निवडणुकीपुर्वी युतीसाठी आग्रही असणा-या भाजप नेते कार्यकर्त्यांनी आता मात्रा सेनेला डावलून एकला चलो रे च्या मानसिकतेत असल्याचे दिसते. लोकसभेच्या यशानंतर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. भाजपचे संख्याबळ वाढत आहे. इच्छूक उमेदवारांची संख्या पाहता भाजपने स्वबळाचा नारा देणे पोषक ठरेल असे भाजप कार्यकर्त्यांना वाटत आहे.

तर, दोन्ही पक्ष वेगळे लढल्यास मतविभाजन होईल, असा शिवसैनिकांचा सूर आहे. तर भाजपला सध्या पोषक वातावरण असल्याने सेनेसोबत जाण्याऐवजी स्वतंत्र निवडणूक लढविणे जास्त योग्य ठरेल, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. दोन्ही पक्षांची युती झाली तर त्याचा फायदा शिवसेनेलाच जास्त होईल, असा कौल दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.