भाजप नेत्यांना एक प्रकारचा माज आलाय !; राज ठाकरेंचा महाजनांना टोला

0
482

मुंबई, दि. ९ (पीसीबी) – गेल्या पाच सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक जण बेघर झाले आहेत. तर अनेकांचा या पूरामुळे मृत्यु झाला आहे. या साऱ्या परिस्थितीमध्येही भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सेल्फिवरून विरोधकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील महाजनांच्या सेल्फी पराक्रमावर टीका केली आहे.

आज पश्चिम महाराष्ट्रात पुरामुळे परिस्थिती गंभीर आहे. मुख्यमंत्री आणि इतर मंत्री फक्त हवाई पाहणी करत आहेत. गिरीश महाजन तर सेल्फी घेत होते. आणि हे असे सगळे करू शकतात कारण त्यांना माहिती आहे की ते निवडून येणारच आहेत. एक प्रकारचा माज आलाय ह्यांना, असे म्हणत राज ठाकरे यांनी सत्ताधारी सरकार निशाणा साधला.

दरम्यान कोल्हापूरमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बोटीत बसून पुराची पाहणी करताना दिसत आहेत. यावेळी एक व्यक्ती हातात मोबाइल घेऊन सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत आहे. या व्हिडीओत आपण फ्रेममध्ये आल्यानंतर गिरीश महाजन हसत हात हलवताना दिसत आहे. पुराच्या ठिकाणी अशा पद्धतीने हसून दाद दिल्याने गिरीश महाजन यांच्यावर टीका होत आहे .