विधानसभा निवडणूकीनंतरच बदलला जाणार भाजप शहराध्यक्ष

0
799

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणूकीची तयारी व युतीच्या वाटाघाटीत पक्षश्रेष्ठी व्यस्त आहेत. त्यामुळे भाजपचा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुर्तास तरी बदलणे अवघड असून निवडणूकीनंतरच शहराध्य बदलण्याचे संकेत मिळत आहेत. आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे व सचिन पटवर्धन यांच्या पैकी किंवा यांच्या गटातील शहराध्यक्ष असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्याच्या विविध भागात पुरपरिस्थिती असल्याने मुख्यमंत्र्यांसह मोठे नेते आपत्ती व्यवस्थापनात व मुख्यमंत्र्यांची सुरू असलेल्या महाजनादेश यात्रेत गुंतलेले आहेत. तसेच विरोधकांना पराजित करण्यासाठी रणनिती व शिवसेनेसह मित्र पक्षांबरोबर युतीची जुळणी सुरू आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष निवड करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना वेळ नसल्याचे दिसते. त्यामुळे सध्या अशा निवड, नियुकत्या होण्याची खात्री नाही.

पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष निवडताना आगामी येणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊनच योग्य व्यक्तीची निवड केली जाणार आहे. पक्ष बांधणी, अंतर्गत रूसवे-फुगवे, बंडखोरी व कुरघोडीला प्रभावीपणे घाताळणाऱ्या तसेच महापालिकेवर पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याची धमक असलेल्या मोठ्या दमाच्या नेत्याची शहराध्यक्ष म्हणून निवड होऊ शकतो. त्यासाठी कोणाची वर्णी लागेल हे पाहणे औसूक्याचे ठरणार आहे.

शहराध्यक्ष व भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांचा अघ्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याचे शहराध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेला आली आहेत. मात्र, जगताप यांनी शहराध्यक्ष पदाची धुरा स्विकारल्यानंतर पक्षाची ताकद वाढवली आहे. त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूकीत विविध गटातटाचे राजकारण सावरत राष्ट्रवादीला धुळ चारली व महापालिकेवर कमळ फुलवले. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत आपले कट्टर निरोधक असलेले युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावली. त्यामुळे जगताप यांनाच पुन्हा शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची दाट शक्यता आहे, किंवा त्यांच्या निकटवर्तीयांपैकी असलेले भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर किंवा अमोल थोरात यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा शहरात दबदबा आहे. २०१४ निधानसभा निवडणूकीत विरोधकांची फौज असताना लांडगे हे अपक्ष निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपची जवळीक साधली. सध्या ते पुर्णपणे भाजपमय झाले असून त्यांच्यातही  शहराध्यक्षपद सांभाळण्याची धमक आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही शहराध्यक्ष पदाची धुरा दिली जाऊ शकते किंवा ते कार्तिक लांडगे यांचेही नाव पुढे करू शकतात.

तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय असलेले सचिन पटपर्धन यांचेही नाव शहराध्यपदाच्या रेसमध्ये आहे. पटवर्धन यांनी आमदार जगताप यांच्या अगोदर शहराध्यक्ष पद भुषवले आहे. त्यामुळे त्यांची किंवा त्यांच्या गटातील एकाची वर्णी लागू शकते.