भोसरी मतदारसंघात महायुती कायम; भाजप-शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले स्पष्ट

0
841

पिंपरी, दि. १५ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेची महायुती तुटल्याचे संदेश सोशल मिडीयावर वाऱ्यासारखे वायरल झाल्याने महायुतीत मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे आज (मंगळवारी) शिवसेना-भाजप पदाधिकाऱ्यानी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत महायुतीत कोणत्याही प्रकारची फुट पडली नसल्याचे जाहीर करावे लागले. सोशल मिडीयावर या संदर्भात फिरणारे संदेश खोटे असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

त्यावेळी महापौर राहुल जाधव, भाजपचे बाबू नायर, शिरूर लोकसभा शिवसेना संघटिका सुलभा उबाळे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, खेड-शिरूर शिवसेना संपर्कप्रमुख इरफान सय्यद आदी उपस्थित होते.

धनंजय आल्हाट म्हणाले की, “महायुतीचे अधिकृत उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांची सोमवारी (दि. १४) बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, भोसरीत महायुती तुटली असून शिवसेना भाजपला मदत करणार नाही, असे संदेश बैठक झाल्यानंतर एक तासभरात सोशल मिडीयात वायरल झाले. हे संदेश खोटे असून अशा प्रकारच्या संदेशावर विश्वास ठेऊ नये”

सुलभा उबाळे म्हणाल्या, “आमदार महेश लांडगे यांचा प्रचार माजी खासदार आढळराव पाटील करत असून महायुती तुटल्याची अफवा शिवसेनेतील कोण करत असेल, तर त्याच्यालर कारवाई करण्यात येईल.”