Banner News

भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा ७७ हजार ५६७ मतांनी विजय; अपक्ष विजयाची परंपरा काढली मोडीत

By PCB Author

October 24, 2019

भोसरी , दि. २४ (पीसीबी) – भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे अधिकृत उमेदवार आमदार महेश लांडगे यांचा ७७ हजार ५६७ मतांनी दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केला. त्यामुळे भोसरी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निवडून येणारी परंपरा लांडगे यांनी मोडीत काढली आहे.

भोसरी मतदार संघातील एकुण १२ उमेदवारांपैकी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. या मतदार संघात ५८.६५ टक्के मतदान झाले असून एकूण २ लाख ६३ हजार ४६३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बालेवाजीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुल याठिकाणी २० टेबलांवर मतमोजणी झाली. मतमोजणीच्या २१ फेर्‍या पार पडल्या. पहिल्या फेरीपासूनच लांडगेंची आघाडी घेतली.  प्रत्येक फेरीअखेर लांडे हे लांडगेंच्या तुलनेत निम्म्या मताने मागे असल्याचे पहायला मिळाले. हे पाहून सातव्या फेरीअखेरच त्यांच्या समर्थकांनी भंडार्‍याची उधळण सुरु केली.