दिघीकरांसाठी आमदार महेश लांडगे यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ – नगरसेवक विकास डोळस

568

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – दिघीतील सुमारे ५० हजार नागरिकांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या भोसरी-दिघी मुख्य रस्त्याचे काम आमदार महेश लांडगे यांच्यामुळे अखेर मार्गी लागले आहे. जागामालक आणि महापालिका प्रशासनामध्ये असलेल्या वादामुळे या रस्त्याचे काम प्रलंबित होते. मात्र, आमदार लांडगे यांनी जागामालक आणि प्रशासनात यशस्वी समेट घडवून आणला. त्यामुळे गेल्या २० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याच्या कामाला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला, असे प्रतिपादन नगरसेवक विकास डोळस यांनी येथे केले.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी दिघी गावठाण येथे झालेल्या बैठकीत नगरसेवक डोळस बोलत होते. यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, नगरसेविका हिरानानी घुले, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, माजी नगरसेविका डॉ. मीना पाटील, आशा सुपे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष नवनाथ मु-हे, अशोक काशिद, सामाजिक कार्यकर्ते कुलदीप परांडे, दत्ता परांडे, संजय गायकवाड, निर्मला गायकवाड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी डोळस म्हणाले की, जागामालक आणि प्रशासनाच्या वादात भोसरी मतदारसंघातील काही रस्त्यांची कामे रखडली होती. ही कामे मार्गी लावण्याचा सपाटा आमदार लांडगे यांनी लावला आहे. यापूर्वीच भोसरी-दिघी शीव रस्ता (सत्संग भवन मार्ग) येथील रस्त्याचे काम २४ तासात पूर्ण करण्यात आले. त्यावेळी लांडगे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे ‘ब्रँडिंग’ केले होते. त्यामुळे दिघीतील रस्त्याचे काम मार्गी लावल्यानंतर ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशा आशयाच्या पोस्ट व्‍हायरल होवू लागल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश झाल्यापासून दिघी गावातील भारतमातानगर ते आळंदी रोडचे काम प्रलंबित होते. गेल्या अनेक वर्षांत तत्कालीन राज्यकर्त्यांनी अनेकदा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले होते. मात्र, जागा मालक आणि प्रशासन यामध्ये समझोता होवू शकला नाही. परिणामी, भारतमातानगर, आदर्शनगर, कृष्णानगर, गणेशनगर आदी भागातील सुमारे ५० हजार नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या रस्त्याचे काम प्रलंबित होते. दरम्यान, आमदार महेश लांडगे यांनी जागामालक धोंडिबा रामभाऊ वाळके, पांडुरंग बाबुराव वाळके आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. अवघ्या एका दिवसात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली. जागा हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करुनच रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत केवळ आश्वासने मिळालेल्या रस्ता प्रत्यक्षात येत असल्याचे समाधान स्थानिक नागरिकांच्या चेह-यावर दिसत असल्याचे डोळस म्हणाले.

 

भोसरी-दिघी ‘कनेक्टिव्‍हीटी’ वाढली

दिघी ग्रामपंचायतची स्थापना १९५९ मध्ये झाली. भोसरी-दिघीला जोडणारे एकूण तीन रस्ते आहेत. त्यापैकी शीवेचा रस्ता हा आमदार लांडगे यांनी पूर्ण केला आहे. त्यानंतर भारतमातानगर ते आळंदी रोडपर्यंत काम पूर्ण करण्यात आले. यापूर्वी येथील स्थानिक नागरिकांना पुणे-आळंदी रोडव्दारे मॅक्झिन कॉर्नरहून वळसा घालून जावे लागत होते. ‘भोसरी व्‍हीजन – २०२०’ या अभियानाच्या माध्यमातून समाविष्ट गावांतील रस्त्यांचे जाळे सक्षम करुन ‘कनेक्टिव्‍हीटी’ वाढण्याचा संकल्प करण्यात आला होता. विशेष म्हणजे, दिघी गावातील प्रलंबित असलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आमदार लांडगे यांना यश मिळाले आहे. तत्कालीन राज्यकर्त्यांनी केवळ भूमीपूजन करुन लोकांची दिशाभूल केली. मात्र, आमदार लांडगे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केले, अशी भावना शिवाई पतसंस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

WhatsAppShare