गणित विधानसभेचे : आमदार महेश लांडगेच युतीचे उमेदवार निश्‍चित

0
1343

भोसरी, दि. २१ (पीसीबी) – आगामी विधानसभेसाठी भाजप-शिवसेना युती होणार असल्याचे जवळपास निश्‍चितच झाले आहे. त्यामुळे भोसरी मतदारसंघ भाजप की शिवसेना यांच्यापैकी कोणाकडे जातो, याबाबत साशंकता आहे. मात्र, मतदार संघ कोणाकडेही गेला, तरी युतीचे उमेदवार विद्यमान आमदार महेश लांडगेच असणार. असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत भोसरीची निर्मिती झाली. त्यावेळी भाजप-शिवसेना युतीत भोसरी मतदार संघ शिवसेनेकडे होता. युतीचे उमेदवार म्हणून सुलभा उबाळे यांना रिंगणात उतरविण्यात आले. मात्र, राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी उबाळे यांचा १२७२ मतांनी पराभव केला. काही काळानंतर लांडे यांनी राष्ट्रवादीत घरवापसी केली.

दरम्यान, भाजप-शिवसेनेतील जागा वाटपाच्या मतभेदामुळे २०१४ मध्ये २५ वर्षांची युती एका झटक्यात तुटली. तर तिकडे राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येही आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे या चारही मोठ्या पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढण्याचे ठरविले. त्यानुसार भोसरी मतदार संघातून राष्ट्रवादीने तत्कालीन आमदार विलास लांडे, शिवसेनेने पुन्हा सुलभा उबाळे, भाजपने एकनाथ पवार व काँग्रेसने हनुमंतराव भोसले यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते व नगरसेवक असलेले महेश लांडगे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष दंड थोपटले. आपली सर्व ताकद पणाला लावून सर्वाधिक मते घेत आमदारही झाले.

परंतु, त्यानंतर माजी आमदार विलास लांडे यांच्याप्रमाणे त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीशी जवळीक साधली नाही. हवेची दिशा ओळखून त्यांनी भाजपशी संलग्न होत, भाजपबरोबर एकरूप झाले. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची १५ वर्षांची सत्ता उलथून टाकण्यात व महापालिकेवर कमळ फुलविण्यात आमदार लांडगे यांचा सिंहाचा वाटा आहे.

दरम्यान, भोसरी मतदार संघ शिवसेनेकडे असला तरी भाजप या मतदार संघासाठी आग्रही आहे. मात्र, जागा वाटपात भोसरी शिवसेनेकडे गेला तर ऐनवेळी आमदार लांडगे सेनेत प्रवेश करून शिवधनुष्य हाती घेत युतीचा उमेदवार म्हणून रणांगणात उतरतील. अशीही शक्‍यता नाकारता येत नाही. असे जाणकारांचे म्हणणे आहे.

भोसरीत तिहेरी ताकद

युती झाल्यास भाजप, शिवसेना व आमदार महेश लांडगे यांच्या एकगठ्ठा मतदारांची मोठी ताकद निर्माण होऊ शकते. असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज असून २०१४ मध्ये भोसरीतील एकूण दोन लाख २१ हजार ३८५ मतदारांपैकी लांडगे यांना ६०,१७३; शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांना ४४,८५७ तर भाजपचे एकनाथ पवार यांना ४३,६२६ मते मिळाली होती. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भोसरी विधानसभेतून आघाडीचे उमेदवार व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यापेक्षा युतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना ३७,०७७ मते अधिक मिळाली होती.

अपक्ष उमेदवारालाच मिळते मताधिक्‍य

भोसरी मतदार संघात २००९ व २०१४ या मागील दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप व शिवसेना आदी पक्षाच्या उमेदवारांना मतदारांनी नाकारत अपक्ष उमेदवाराच्या गळ्यात आमदारकीची माळ टाकली होती. मात्र, २०१९ मध्ये तीच पुनरावृत्ती होते का, हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.