Pune Gramin

राज्यमंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी धोक्यात?

By PCB Author

October 01, 2019

मावळ, दि. १ (पीसीबी) – भारतीय जनता पार्टी व शिवसेना युतीची घोषणा सोमवारी (दि. ३०) झाली. त्यानंतर आज भाजपने १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये अनेक विद्यमान आमदारांना डिच्चू तर अनेकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. मात्र, यामध्ये राज्यमंत्री असलेले भाजपचे आमदार बाळा भेगडे यांचे नाव नाही. त्यामुळे मावळ मतदारसंघात भेगडे यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

मावळ मतदारसंघातून राज्यमंत्री भेगडे यांनाच भाजप उमेदवारी देणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, भाजपचे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या गटातील निष्ठांवान कार्यकर्ते सुनिल शेळके यांनी भाजप तिकीटासाठी जोर लावला असून मागे त्यांनी मुलाखतही दिली आहे. तसेच भाजपच्या झेंड्याखाली काही दिवसांपासून प्रचारही सुरू केला आहे. शेळके यांना मतदारसंघातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप पक्षश्रेष्ठींनी यांची गंभीर दखल घेत, मावळच्या जागेची या यादीत उमेदवारी जाहीर केलेली नाही.

दरम्यान, मावळ विधानसभेतून भाजपची उमेदवारी आमदार भेगडे किंवा सुनिल शेळके यांना मिळणार हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सुनिल शेळके यांनी उमेदवारी मिळाल्यास भेगडे यांची हॅट्रीक हुकणार.