महिलेच्या धाडसामुळे वाचला चिमुरडीचा जीव

304

पिंपरी, दि. १९ (पीसीबी) – प्रसंगावधान राखत महिलेने केलेल्या धाडसामुळे पंधरा फुट पाण्याच्या टाकीत पडलेल्या अडीच वर्षाच्या चिमुरडीचा जीव वाचला. ही घटना शुक्रवारी (दि. १८) सकाळी दहाच्या सुमारास मोशीतील इंद्रायणी पार्कमध्ये घडली.

शारदा चंद्रशेखर तलवार असे त्या धाडसी महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कनक बिंग ही चिमुरडी घराच्या अंगणात खेळत असताना १५ फुट पाण्याच्या टाकीत पडून बुडू लागली. टाकीत पडलेली मुलगी शेजारी राहणाऱ्या तलवार यांनी पाहिल्याने त्या धावत टाकीजवळ आल्या. त्यावेळी टाकीत सुमारे १० फुट पाणी होते. मात्र, कोणताही विचार न करताना तलवार यांनी पोहता येत नसतानाही टाकीत उडी घेत बुडणाऱ्या चिमुरडीला आधार दिला. दरम्यान त्याच वेळी मुलीच्या आईने आरडाओरडा केल्याने नागरिक तातडीने मदतीसाठी धाऊन आले. त्यांनी मुलीला व तलवार यांनी टाकीतून बाहेर काढले.

तलवार यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता केलेल्या धाडसामुळे चिमुरडीचा जीव वाचला. त्यामुळे तलवार यांचे परिसरात कौतुक होत आहे. पाण्याच्या टाकीत बुडून अनेक चिमुरड्यांचा जीव गेला असून याबाबत योग्य ती सुरक्षेची काळजी संबंधितांनी घेतली पाहिजे.

WhatsAppShare