Others

आंद्रा धरण भरले शंभर टक्के; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

By PCB Author

July 27, 2019

लोणावळा दि, २७ (पीसीबी) – दोन दिवस सुरू असलेल्या संतधार पावसामुळे मावळातील आंद्रा धरण शंभर टक्के भरले असून शनिवारी सकाळी सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. मावळातील धरणांपैकी सर्वात पहिले शंभर टक्के भरलेले हे धरण असून पावसाचा जोर कायम असल्याने अंद्रायणी आणि इंद्रायणी नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्याची पातळी वाढली तर धरणातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. आंद्रा धरणातील पाणी अंद्रायणी व इंद्रायणी नदीतून थेट उजनी धरणात पोहचते. याशिवाय तळेगाव औद्योगिक वसाहत व  देहू, आळंदी तीर्थस्थळासह स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी व शेतीसाठी हे पाणी वापरता येते.

दरमान्य, धरण परिसरात दिवसभरात १५३ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने आतापर्यंत ९१२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पाण्याचा साठा ८३.३० दशलक्ष घनमीटर इतका असून त्यापैकी उपयुक्त साठा ८२.७४ दशलक्ष घनमीटर आहे. धरण शंभर टक्के भरल्याने पाण्याची पातळी ७१४ मीटरवर गेली आहे.