कोल्हापुरात १९ कोटी चे अनुदान वाटप

0
328

कोल्हापूर, दि. १९ (पीसीबी) – कोल्हापुरातील निवारा केंद्रात असलेले लोक आता परत आपापल्या घरी मागारी फिरु लागले आहे. रविवार (दि.१८) अखेर पूरग्रस्तांना १९ कोटी ७८ लाख २० हजार इतक्या रकमेचे वाटप करण्यात आले. शहरातील पूरग्रस्त मात्र सानुग्रह अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. बचाव कार्यासाठी देशभरातून मागविण्यात आलेली सर्व पथके बोटींसह परत पाठविण्यात आली.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सुमारे साडेचार लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यामध्ये शिरोळ तालुक्यातील लोकांची संख्या अधिक हेाती. त्यासाठी पावणेचारशे निवारा केंद्रे सुरू करण्यात आली होती. शहरातील निवारा केंद्रातील पूरग्रस्तांनी १५ ऑगस्टपासूनच आपापल्या घरी जाण्यास सुरुवात केली होती. शिरोळ तालुक्यातील पाणी न उतरल्याने तसेच काही गावांना पाण्याचा वेढा तसाच राहिल्यामुळे येथील लोकांना आपल्या घरी जाण्यात अडचणी होत्या. त्यामुळे निवारा केंद्रांची संख्या वाढवावी लागली होती. स्थलांतर करण्यात आलेल्यांमध्ये सुमारे सव्वा लाख कुटुंबांचा समावेश होता. पाण्याची पातळी कमी झाल्याने आता शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावात उभारण्यात आलेल्या निवारा केंद्रातून लोक आपल्या घरी परतू लागले आहेत.