Pune

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पोराने बापालाच संपवलं….

By PCB Author

January 07, 2022

पुणे, दि. ७ (पीसीबी) – वयाच्या 86 व्या वर्षी वडिलांनी लग्न करण्याच्या हेतूने वधू वर सूचक मंडळात नाव नोंदणी केली. याचा राग आल्यामुळे मुलाने वडिलांची हत्या केल्याचं उघडकीस आलं आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरु नगरमध्ये झालेल्या भीषण हत्याकांडामागील कारण समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रॉपर्टीत वाटेकरुच्या भीतीने पोराने बापाला संपवल्याचा आरोप आहे…

वडिलांनी दुसरे लग्न केले, तर समाजात वावरताना अपमान होईल. शिवाय मालमत्तेत हिस्सेदार होईल, या रागाने मुलाने थेट वडिलांच्या गळ्यावर घरातील सुरीने वार केले. सुरी बोथट असल्याने गळा चिरला जात नव्हता. म्हणून मुलाने घरातील दगडी वरवंटा तोंडावर, डोक्यावर हाणून वडिलांना संपवलं, अशी माहिती खेड पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी दिली.. गुरुवारी खुनानंतर मुलाने खेड पोलीस ठाण्यात जाऊन या गुन्ह्याची माहिती दिली. तोच फिर्यादी झाला आहे. शंकर रामभाऊ बोऱ्हाडे (वय 86 वर्ष) असं मयत वडिलांचं नाव आहे. तर शेखर बोऱ्हाडे (वय 47 वर्ष, रा. राजगुरुनगर) असं आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या राजगुरुनगर पोलीस पुढील तपास करत आहेत…