`कुटुंबात होणारे अती लाड, संस्कारांचा आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडतात`

0
1011

पिंपरी, दि. १६ (पीसीबी) :  “राष्ट्रीय बालगुन्हेगारी विषयी वेळोवेळी झालेल्या सर्वेक्षणांच्या निष्कर्षातून हे स्पष्ट झाले आहे की, बालगुन्हेगारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून बहुतांश गुन्हेगार हे सनाथ कुटुंबातील आहेत. या मागील कारणांवर विचार केल्यावर लक्षात येते की, कुटुंबात होणारे अती लाड, संस्कारांचा अभाव आणि शिस्तीचा अभाव यातूनच पुढे बालगुन्हेगार घडत आहेत. हे रोखण्यासाठी पालकांनी वेळीच जागे होऊन आपल्या मुलांकडे लक्ष देणे आवश्यक आहे,” असे मत पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले.

रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था, टॉक टू मी व विलास जावडेकर डेव्हलपर्स यांच्या सीएसआर उपक्रमांतर्गत आयोजित ‘विधीसंघर्षग्रस्त बालकांचे समुपदेशन’ या बाल अपराधींच्या पुनर्वसनाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे या चार दिवसीय समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पिंपरी चिंचवड मधील १८ पोलीस स्थानकांअंतर्गत २३४ बाल्गुन्हेगारांचे सामुपदेशन, कल चाचणी, मानसिक चाचणी करण्यात येणार आहे. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त मंचक इप्पर, परिमंडळ २ चे उपायुक्त आनंद भोईटे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे सर्वेश जावडेकर, रेवांशी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेचे सचिन कुंदोजवार, कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे रसिकलाल धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक प्राचार्य भरत कासार, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नरेंद्र कंजीर आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी कृष्ण प्रकाश म्हणाले की, “आपण स्वार्थापुढे बाकी सर्व काही विसरतो आणि आपल्याच लोकांचे रक्त प्यायलाही कमी करत नाही. बालगुन्हेगार घडण्यामागे बरीच करणे आहेत. त्यात प्रामुख्याने आवेगावर ताबा नसणे, चुकीचे संस्कार, व्यसने इत्यादी आहेत. सर्वेक्षणानुसार बालगुन्हेगारात ९९ टक्के मुलांचे प्रमाण आहे. यामागचे कारण आपल्या पुरुषप्रधान संस्कुतीची मानसिकता आहेत. मुलींना लहानपणापासूनच इच्छांना आवर घालायला शिकविले जाते. त्यांनी असे वागू नये तसे वागू नये असे शिकविले जाते. परंतू मुलाने काहीही केले तरी ‘तो मुलगा आहे, चालते’ असे म्हणून त्याला अडवले जात नाही. हवे ते लगेच दिले जाते. यातूनच त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची उर्मी वाढून त्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. कुठे थांबायला हवे, काय योग्य हे बघणे, नकार पचविणे याचे संस्कार करणे पालकांची जबाबदारी आहे. मात्र आता तो वेळच पालकांकडे नाही, हे दुर्दैव आहे.”

सर्वेश जावडेकर म्हणाले, “नोकरी मागणाऱ्यापेक्षा अजून ४ लोकांना नोकरी देणारे बनण्याच्या दृष्टीने विचार करावा. कोणताही व्यवसाय फळास येण्यासाठी संय्यम ठेवून स्वतःला १५ वर्षांचा काळ द्यायला हवा. जर तुमच्याकडे भक्ती, शक्ती आणि युक्ती असेल तर यश तुम्हाला नक्कीच मिळते. फक्त व्यसनांना स्वतःपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.”

डॉ. कंजीर म्हणाले, “कोणत्याही कृतीमागे काही कारणे असतात, काहीतरी काहाणी असते. ती समजून घेतली तरच त्या गुन्ह्याच्या मुळाशी पोहचू शकतो. या कार्यशाळेत आम्ही प्रत्येकाशी वैयक्तिकरित्या संवाद साधून ते समजून घेऊन त्यानुसार त्यांचे समुपदेशन करणार आहोत.” या कार्यशाळेतून या वाट चुकलेल्या मुलांचे पुनर्वसन करत त्यांना नोकरीसाठी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्व मदत पुरवली जाणार असल्याचेही यावेळी सांगितले.