तुम्ही अजून किती जणांची घरे तोडणार…, किती लोकांचे आवाज बंद करणार… कंगना राणौतचा खडा सवाल

0
221

मुंबई, दि. ४ (पीसीबी) – रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णव गोस्वामी यांना अटक केल्याच्या प्रकरणात आता भाजप बरोबर अभिनेत्री कंगना राणौत सुध्दा जाम भडकली आहे. महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि काँग्रेसला जाब विचारणारे ट्विट तिने केले आहे. तुम्ही अजून किती जणांची घरे तोडणार, किती लोकांचे आवाज बंद करणार असा खडा सवाल तिने केला आहे.

वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई येथील राहत्या घरातून अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई करण्यात आली. यावेळी अर्णब गोस्वामी यांच्या घरी अनेक नाट्यमय घडामोडी पहायला मिळाला. अर्णब गोस्वामी यांनी पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला असून आक्षेपार्ह उल्लेख केले आहेत.

कंगनाने म्हणते, तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात? अशी विचारणा कंगनाने ठाकरे सरकारला केली आहे. तिने म्हटलं आहे की, “मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे, तुम्ही अर्णब गोस्वांमी यांच्या घरात घुसून मारलं आहे, केस ओढले. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती गळे दाबणार आहात? किती आवाज बंद करणार आहात?”.

कंगनाने यावेळी पुन्हा एकदा सोनियासेना उल्लेख करत, “सोनियासेना किती तोंडं बंद करणार आहात? ही तोंडं वाढतच जाणार आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी किती जणांचा बळी दिला गेला. एक आवाज बंद केला तर इतर आवाज उठतील,” असं म्हटलं आहे. “पेंग्विन म्हणाल्यावर राग का येतो. पेंग्विनसारखं दिसतात तर म्हणणार ना…वडिलांच्या पप्पूसारखं काम केलं तर पप्पूच म्हणणार ना..सोनियासेना म्हटल्यावर राग येतो का…तुम्ही आहात सोनियासेना,” असंही कंगनाने पुढे म्हटलं आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.