8 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन

0
333

पुणे, दि.29 (पीसीबी) : वाढत्या उष्णतेचा सामना करत असलेल्या महाराष्ट्राला लवकरच दिलासा मिळणार आहे. येत्या दि. 8 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्याचबरोबर मान्सूनच्या आगमनापूर्वी राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळणार आहेत. लॉकडाऊनमुळे घरात बसलेल्या नागरिकांना ही आनंदाची बातमी आहे.

अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने दि. १ जून रोजी मान्सूनचे केरळमध्ये आगमन होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
मान्सूनने गुरुवार (दि.28) अंदमान-निकोबार बेटे, दक्षिण बंगालचा उपसागर, मालदीव-कोमोरीन क्षेत्राचा काही भाग व्यापला. अरबी समुद्रामध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. आग्नेय आणि पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये दि. 31 मे ते दि. 4 जून दरम्यान कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाचे पुणे येथील शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी येत्या 8 जूनला राज्यात मान्सूनचे आगमन होणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर दि. 30 जूनपासून मान्सूनपूर्व पावसास सुरुवात होणार असल्याचा अंदाजही त्यांनी वर्तवला.