`पुणे स्मार्ट सिटी` च्या कामांची चौकशी करा – खासदार गिरीश बापट यांची केंद्र सरकारकडे मागणी

0
1007

पुणे, दि. १७ (पीसीबी) – पुणे शहरात सुरू असलेली `स्मार्ट सिटी` अंतर्गत जी कामे सुरू आहेत ती अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत. बहुसंख्य कामे ही नियमबाह्य आहेत. केंद्र सरकारने दिलेल्या निधीचा वापर व्यवस्थित झालेला नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पुणे शहराचे खासदार गिरीश बापट यांनी केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाकडे एका पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, महापालिकेत भाजपची सत्ता असताना भाजप खासदार बापट यांनी मागणी केल्याने राजकीय वर्तुळात काहिशी खळबळ आहे.

नगरविकास विभागातील स्मार्ट सिटी मिशनचे प्रमुख दुर्गाशंकर मिश्रा यांना पाठविलेल्या पत्रात खासदार बापट म्हणतात, केंद्र सरकारने पुणे स्मार्ट सिटीला पुरेसा निधी दिलेला आहे. मात्र त्या निधीचा पुरेपूर विनियोग झालेला दिसत नाही. तसेच ज्या कामांवर खर्च केला आहे, त्यांचा दर्जा निकृष्ट आहे. काही कामे नियमबाह्य पध्दतीने झालेली आहेत. तसेच कंपनीच्या कारभाराचे लेखापरिक्षणही झालेले नाही त्यामुळे कंपनीने केलेल्या कामांची सखोल चौकशी करावी. किमान त्यामुळे तरी यापुढील कामांची दर्जा उंचावेल आणि सुरू असलेले प्रकल्प निश्चित काल मर्यादेत पूर्ण होतील. कंपनीचे कामकाज योग्य पध्दतीने सुरू नाही. अनेक प्रकल्प प्रदीर्घ काळ रेंगाळलेले आहेत. तसेच जे प्रकल्प सुरू आहेत त्यावर उधळपट्टी झालू असून त्यात अनेक त्रृटी आहेत. असेही बापट यांनी सांगितले.

पुणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सल्लागर समितीची बैठक नुकतीच झाली. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनीही कंपनीच्या कामाबाबत नापसंती व्यक्त करून झालेल्या कामांचा चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे, असेही खासदार बापट यांनी निदर्शनास आणून दिले आहे.