निगडीत गुटखा विक्री करणाऱ्या एका गुटखा तस्कराला १६ हजारांच्या गुटख्यासह अटक

427

 

निगडी, दि.२६ (पीसीबी) – संचारबंदी असताना दुचाकीवरुन राजरोसपणे गुटखा विक्री करणाऱ्या एका गुटखा तस्कराला पोलिसांनी १६ हजारांच्या गुटख्यासह अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि.२५) दुपारी अडीचच्या सुमारास निगडीतील ओटास्कीम येथे करण्यात आली.

संचारबंदी असताना देखील शहर परिसरात बिनधास्तपणे मद्य, गुटखा, तंबाखू् आणि सिगारेट विक्री सुरु आहे. या सर्व वस्तू विक्री करणारे लोक व्यसनाधीन नागरिकांनाचा फायदा घेतात. पोलिसांना हाफता देतात आणि ज्यादा किमतीने या वस्तू विकून बक्कळ पैसा कमवतात. या असंवेधनशील नराधमांवर कोणत्याही कोरोना, संचारबंदी या गोष्टींचा परिणाम होत नाही. पिंपरीमध्ये तर एका पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर पोलिसांच्या डोळ्यादेखत मद्य विक्री होते. यावर आता पोलिस प्रशान काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मेहबुब हुसेन करवल (वय २४, रा. स्वामी विवेकानंद शाळेसमोर, ओटास्कीम, राजनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या गुटखा तसकराचे नाव आहे. त्याच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास गुन्हे शाखेचे पोलिस आणि अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस निगडी ओटास्कीम परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना तेथे मेहबुब हा एमएच/१४/जीजे/७८६९ या दुचाकीवरुन गुटखा विक्री करत असल्याचा आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या दुचाकीची तपासणी केली असता त्याच्याकडे तब्बल १६ हजार ४५२ रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त करुन मेहबुब याला अटक केली आहे. निगडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

WhatsAppShare