महिला पोलिसाकडे मागितली पाच लाखांची खंडणी

440

पिंपरी, दि. 17 (पीसीबी) – आपण दोघांनी काढलेले फोटो पाहिजे असतील तर पाच लाख रुपये दे. तू एकटी भेट तुझ्या तोंडावर ऍसिड टाकतो, अशी धमकी एका पोलिसाने महिला पोलिस कर्मचाऱ्यास दिल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली.

आनंदा शाहू चौहाण (वय 35, रा. साईनाथनगर, कोंढवा, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी पोलिसाचे नाव आहे. याबाबत 32 वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उपनिरीक्षक हरिदास बोचरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला पोलीस या कर्तव्यावर चालल्या होत्या. त्यांना आनंदा याने अण्णासाहेब मगर स्टेडिअमजवळ अडविले व भर रस्त्यात त्यांचा विनयभंग केला. तसेच त्यांना शिवीगाळही केली.

“”तू माझी झाली नाही तर तुला कोणाचीच होऊ देणार नाही. तू फक्‍त एकटी भेट तुझ्या तोंडावर ऍसिड फेकल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या नवऱ्यालाही मारून टाकेल. आपल्या दोघांचे फोटो माझ्याकडे आहेत. ते सगळ्यांना दाखवून तुझी बदनामी करेल. तुला फोटो पाहिजे असतील तर मला पाच लाख रुपये दे.” तसेच फिर्यादी यांच्या पतीसही जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच आरोपीने स्वतःच्या व्हॉटस्‌ऍप डीपीला फिर्यादी यांचा फोटो ठेवला असून, पिंपरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.