Pimpri

5 प्रभागांसाठी 1 निवडणूक निर्णय अधिकारी, शहरात 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार

By PCB Author

July 12, 2022

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पाच प्रभागांसाठी एक निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहेत. महापालिकेसाठी एकूण 46 प्रभाग आहेत. त्याचा विचार करता नऊ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

महापालिका निवडणुका अद्यापि घोषित झाल्या नसल्या तरी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेची तयारी करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. प्रथम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यानंतर आरक्षण टाकण्यात आले. सध्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून आहे. राज्य निवडणूक आयोगाने आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार चार ते पाच प्रभागांसाठी एक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केला जाईल. उपजिल्हाधिकारी व त्यापेक्षा अधिक वरच्या संवर्गातील निवडणूक निर्णय अधिकारी राहील. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी एकूण 46 प्रभाग आहेत. त्याचा विचार करता नऊ निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले जातील. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन केला जाणार आहे. खर्चाचा हिशेब ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाणार आहे. महापालिका आयुक्त निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहतील. सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचारी हे महापालिका आयुक्तांच्या नियंत्रण आणि पर्यवेक्षणाखाली काम करतील.