200 कोटींचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण: जॅकलिन पाठोपाठ आता अभिनेत्री नोरा फतेहीला ईडीकडून समन्स

166

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बोलावले आहे. नोराला बोलावून या प्रकरणात आज चौकशीत सामील होण्यास सांगितले आहे. अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणी नोरा फतेही हिचा जबाब नोंदवायचा आहे.

सुकेशवर नोरा फतेहीचीच नव्हे, तर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचीही फसवणूक केल्याचा आरोप आहे. नोरा फतेहीसोबत ईडीने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा बोलावले आहे. ईडीने जॅकलिनला एमटीएनएल येथील ईडी कार्यालयात उद्या म्हणजेच शुक्रवारी चौकशीत सामील होण्यासाठी बोलावले आहे. सुकेशने जॅकलिनलाही त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला होता.

याआधी जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली होती. आधी ईडीला वाटले की, जॅकलिन या प्रकरणात सामील आहे, पण नंतर कळले की ती या प्रकरणाची व्हिक्टीम आहे. सुकेशने लीना पॉलच्या माध्यमातून जॅकलिनची फसवणूक केली होती. जॅकलीनने ईडीला दिलेल्या पहिल्या निवेदनात सुकेशशी संबंधित अनेक महत्त्वाची माहिती शेअर केली होती. अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आज (14 ऑक्टोबर) होणाऱ्या चौकशीत नोरा सहभागी होईल की, नाही हे अद्याप ठरलेले नाही. सुकेशचंद्र शेखर आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री लीना पॉल तिहार जेलच्या आतून 200 कोटी रुपये उकळल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. असे सांगितले जात आहे की, इतर लोकांप्रमाणेच सुकेशने नोरा फतेहीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा कट रचला होता. नोरा आणि जॅकलिन व्यतिरिक्त सुकेशच्या निशाण्यावर अनेक बॉलिवूड कलाकार आणि चित्रपट निर्माते होते.

फसवणुकीच्या प्रकरणात सुकेशची कथित पत्नी लीना पॉलही पोलिसांच्या ताब्यात आहे. फसवणुकीच्या प्रकरणात लीनाने सुकेशला पूर्ण पाठिंबा दिला. तुरुंगातूनच सुकेश लीनाच्या माध्यमातून आपले फसवणुकीचे नेटवर्क चालवत होते. अटक केल्यानंतर लीनाने चौकशीत सांगितले होते की, ती सुधीर आणि जोएल नावाच्या दोन लोकांसोबत फसवणूक झालेले पैसे लपवण्यासाठी वापरत होती.

अहवालांनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आहे, ज्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा आधीच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात अंडर ट्रायल सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या 20 स्वतंत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. याआधी जॅकलीन फर्नांडिसची सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात साक्षीदार म्हणून नवी दिल्लीत 6 तास चौकशी करण्यात आली होती.