170 सीसीटीव्ही तपासून पकडले दोन चेन चोरटे; साडेबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0
252

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – शहरातील 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून पोलिसांनी चेन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 10 लाखांचे सोने आणि दोन लाख 60 हजारांच्या दुचाकी असा बारा लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. खंडणी विरोधी पथक आणि चिंचवड पोलिसांच्या सयुंक्त पथकाने ही कामगिरी केली.

प्रभाकर येमनप्पा दोडमणी (वय 26, रा. आनंदनगर, चिंचवड), अल्ताफ सलीम शेख (वय 19, रा. हांडेवाडी, हडपसर, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून शहरात चेन चोरट्यांनी उच्छाद मांडला होता. मॉर्निंग वॉक आणि सायंकाळी बाहेर पडणाऱ्या महिला टार्गेट होत आहेत. या पार्श्वभूमीवर चेन चोरटे पकडण्यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पोळ यांनी त्यांचे तीन आणि चिंचवडचे एक अशी चार पथक तयार केले.

चारही पथके माहिती संकलित करीत असताना पोलीस नाईक आशिष बोटके आणि स्वप्नील शेलार यांना माहिती मिळाली की, आरोपी आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड परिसरात फिरत आहेत. त्यानुसार पोलीसांनी सापळा लावून आरोपींना बेड्या ठोकल्या.

आरोपींनी सुरुवातीला चिंचवड येथे दूध खरेदीसाठी आलेल्या एकाच महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी शहरात एकूण 15 ठिकाणी चेन हिसकावली आणि पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

चोरट्यांकडून पोलिसांनी 10 लाख रुपये किमतीचे 200 ग्रॅम सोन्याचे दागिने, 2 लाख 60 हजारांची 5 वाहने असा एकूण 12 लाख 60 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चेन चोरीचे 15 आणि वाहन चोरीचे 5 असे एकूण 20 गुन्हे उघडकीस आले आहेत.

खंडणी विरोधी पथकाने अटक केलेला प्रभाकर दोडमनी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहर, पुणे रेल्वे, हुबळी, गदग कर्नाटक परिसरात जबरी चोरी, वाहन चोरीचे एकूण सात गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही आरोपींवर मोक्काची कारवाई केली जाणार असल्याचेही आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील, प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकीर जिनेडी, अंमलदार अशोक दुधवणे, गणेश हजारे, निशांत काळे, सुनिल कानगुडे, किरण काटकर, आशिष बोटके, संदीप पाटील, शैलेश मगर, सुधिर डोळस, प्रदीप गुट्टे, शकुर तांबोळी, आशोक गारगोटे तसेच चिंचवड पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, अंमलदार स्वप्नील शेलार, गोविंद डोके, विजयकुमार आखाडे यांच्या पथकाने केली आहे.