13 वर्षीय मुलाने बुडणाऱ्या तिघांना वाचवले

46

भोसरी, दि. 28 (पीसीबी): मित्रांसोबत पोहण्यासाठी बुडणाऱ्या तिघांना वाचवलेलावात गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला, तर दोन मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. ही किमया एका 13 वर्षीय मुलाने केली आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी सद्‌गुरूनगर, भोसरी येथे घडली.

सूरज अजय वर्मा (वय 12, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) आणि ओमकार प्रकाश शेवाळे (वय 13) असे मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. संदीप भावना डवरी (वय 12), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय 14) या मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. आयुष गणेश तापकीर (वय 13) याने बुडणाऱ्या तिघांना वाचवले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्‌गुरूनगर, भोसरी येथील जुन्या कचरा डेपोजवळ तलाव आहे. या तलावामध्ये चार अल्पवयीन मुले सोमवारी दुपारी पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना तलावातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्याने ती मुले बुडू लागली. दरम्यान, आयुष तिथे म्हैस चारण्यासाठी गेला होता. मुले तलावात बुडत असल्याचे आयुषच्या लक्षात आले. त्याने तात्काळ तलावात उडी मारून बुडणाऱ्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

आयुष याने संदीप, ओमकार आणि ऋतूराज या तिघांना पाण्याबाहेर काढले. मात्र सूरजला तो वाचवू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींपैकी दोघांना वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ओमकार शेवाळे याची प्रकृती गंभीर होती. दरम्यान, प्रकृती गंभीर असणाऱ्या ओमकारचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. सुरजचा मृतदेह शोधण्यासाठी अग्निशामक विभागाला बोलावण्यात आले असून अग्निशमन विभागाच्या जवानांनी सुरजचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला आहे.

WhatsAppShare