Desh

116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ‘ही’ ड्राय रन घेतली गेली

By PCB Author

January 02, 2021

नवी दिल्ली,दि.०२(पीसीबी) : भारतामध्ये पहिल्या कोविड 19 लसीला DGCI कडून मंजुरी मिळण्याआधी देशभर लसीची ड्राय रन घेतली जात आहे. 116 जिल्ह्यांमधील 259 केंद्रावर ही ड्राय रन घेतली गेली आहे. त्यापैकी दिल्लीच्या जीटीबी हॉस्पिटलमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी स्वतः जाऊन आढावा घेतला आहे. यावेळेस त्यांनी मीडीयाशी बोलताना दिल्ली सोबतच भारतभर कोविड 19 चे लसीकरण हे मोफत उपलब्ध असेल अशी माहिती दिली आहे.

आज त्यांनी जातीने लसीकरणाच्या ड्राय रनच्या वेळेस माहिती कशाप्रकारे फीड होतेय? लसी कशा ठेवल्या आहेत? याची माहिती घेतली आहे. देशभरातून फीडबॅक देखील घेतला आहे. दरम्यान यानंतर मीडीयाशी बोलताना त्यांनी कोविड 19 च्या लशीबद्दल नागरिकांनी अफवांना बळी पडू नका असं पुन्हा आवाहन केले आहे. पोलिओ लसीच्या वेळीदेखील अशाप्रकारे अफवा पसरवल्या जात होत्या मात्र नागरिकांनी उत्स्फुर्तपणे लसीकरणाला प्रतिसाद दिला आणि आज भारत पोलिओ मुक्त आहे.

केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईननुसार देशात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ड्राय रनची प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये काही राज्यांमधून फीडबॅक आले आहेत. CoWIN अ‍ॅपद्वारा लस देणार्‍यांना लसीबाबत माहिती दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर गंभीर परिणाम दिसल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी एक विशेष कक्ष सज्ज ठेवला जाणार आहे.