भाषण तर कुणीही करू शकतं असे म्हणत रोहित पवारांचा ‘या’ भाजप नेत्याला सणसणीत टोला

67

मुंबई, दि. १5 (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या फळीतील नेतृत्व म्हणून रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आपली अशी वेगळी ओळख निर्माण करत आहेत. २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी कर्जत-जामखेड मतदारसंघ पिंजून काढून त्यांनी आपल्यातल्या कसलेल्या नेत्याची चुणूक दाखवून दिली होती. खुद्द शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले रोहित पवार आता राज्याच्या विधानसभेत आणि विधानसभेबाहेरही विरोधकांना खडे बोल सुनावण्यात मागेपुढे पाहात नाहीत. ‘लोकसत्ता डॉट कॉम’नं घेतलेल्या विशेष मुलाखतीमध्ये रोहित पवार यांनी राज्यातील करोनाची परिस्थिती आणि त्यामध्ये विरोधकांकडून वेळोवेळी घेतल्या जाणाऱ्या भूमिका यावर परखड भूमिका व्यक्त केली आहे.

“महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न विरोधी पक्षांनी केंद्राकडे मांडायला हवे आहेत. भाषण तर कुणीही करू शकतं. पण भाषण करून चालणार नाही, आज जीव वाचवायचे आहेत. राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला. राज्यात मुख्यमंत्री आणि सर्व पक्ष मिळून लढत आहेत. पैसे नसूनही उपलब्ध पैसा योग्य पद्धतीने वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण केंद्राने जी मदत करायची होती ती केली नाही”, असं ते म्हणाले.

राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपावर रोहित पवार यांनी यावेळी बोलताना निशाणा साधला आहे. “लस पुरवठा आणि इतर बाबींची एकंदर आकडेवारी बघता इथल्या लोकांना न्याय देण्यात केंद्र सरकार कमी पडतंय. आणि विरोधी पक्षही राज्याची भूमिका केंद्राकडे मांडण्यात कमी पडतायत. ते केंद्राशी काहीच बोलत नाहीत. त्यांचं तिथे चालत नाही किंवा मोठ्या नेत्यांशी कसं बोलायचं हा त्यांना प्रश्न पडतो. मग ते राज्य सरकारशीच बोलतात”, असं रोहित पवार यावेळी म्हणाले.

“राज्य सरकार योग्य काम करत नसेल, तर तुम्ही बोललंच पाहिजे. त्यालाच विरोधक म्हणतात. पण त्याच राज्य सरकारला किंवा लोकांना व्हॅक्सीन लागतं, जीएसटीचा पैसा अडकतो तेव्हा तुम्ही एकही पत्र लिहीत नाही. या अन्यायाकडे तुम्ही दुर्लक्ष करता का? आधी आपल्या राज्याला अडचणीत आणायचं आणि नंतर तेच भाषणं करतील की बघा राज्य सरकारनं काहीच केलं नाही”, अशी टीका रोहित पवार यांनी यावेळी केली.

WhatsAppShare