‘त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यांना दररोज आम्ही चपलेने मारू’

0
1404

उल्हासनगर, दि.१० (पीसीबी) : ‘आयलानी हे लोकांची कामं करत नाही. त्यामुळे त्यांना दररोज चपलेने मारू’, अशी धमकी उल्हासनगरचे भाजप आमदार कुमार आयलानी यांना त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्ते राम वाधवा यांनी दिली आहे. त्यामुळे उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.

कोरोनाच्या कठीण काळात उल्हासनगरचे भाजपचे आमदार कुमार आयलानी हे शहरात फिरत नाही. तसेच ते लोकांची काहीही मदत करत नसल्याचा आरोप राम वाधवा यांनी केला आहे. ‘आयलानी हे त्यांच्या कुटुंबियांसमवेत त्यांच्या लोणावळ्याच्या कुमार रिसॉर्टला जास्त असतात. त्यामुळेच त्यांनी आमदार कुमार आयलानी यांना आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या आठ दिवसात कुमार आयलानी यांनी दररोज शहरात फिरावं, लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. अन्यथा त्यानंतर त्यांना दररोज आम्ही चपलेने मारू’, असा इशारा देत राम वाधवा यांनी आयलानी यांना बजावलं आहे.

वाधवा पुढे असही म्हणाले कि, ‘आयलानी यांचा 3 वर्षांचा कार्यकाळ उरला आहे. त्यामुळे तितके दिवस आमच्यापैकी कुणीतरी दररोज त्यांना जिथे दिसतील तिथे चपलेने मारु. त्यासोबतच पोलीस आमच्यावर केस करणार असतील, तर त्यासाठीही आम्ही सगळी तयारी केली आहे. जामीन, वकील तयार ठेवले आहेत.’ राम वाधवा यांनी याबाबत ट्वीट केले असून त्यात त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनाही टॅग केले आहे. या सगळ्याबाबत आमदार कुमार आयलानी यांना विचारलं असता, त्यांनी आपण दररोज लोकांचीच कामं करत असल्याचं सांगितलं. आपण दररोज दिवसभर ऑफिसला बसलेलो असतो. शिवाय शहरातही एकटे फिरतो. त्यामुळे ज्यांची हिंमत असेल त्याने मला फक्त हात लावून दाखवावा, असा अप्रत्यक्ष इशारा आयलानी यांनी राम वाधवा यांना दिला आहे.

या सर्व प्रकारानंतर आमदार कुमार आयलानी यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी राम वाधवा यांची तक्रार करण्याचा निर्णय घेतला असून राम वाधवा यांनी यापूर्वी निवडणुकीच्या काळात पप्पू कलानी यांना आतंकवादी म्हणून संबोधलं होतं. त्यामुळेही बराच वाद उल्हासनगर शहरात पेटला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशारितीने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर पुढे त्याचं नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल.