Maharashtra

ॲड. गुणरत्न सदावर्ते सह १०५ एसटी कर्मचारी अटकेत

By PCB Author

April 09, 2022

मुंबई, दि. ९ (पीसीबी) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ या निवास स्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी एसटीच्या आंदोलक कर्मचाऱ्यांचे वकिल ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दीड तासाच्या चौकशीनंतर मुंबईच्या गावदेवी पोलिसांकडून शुक्रवारी (ता. ८ एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास अटक करण्यात आली. इतर १०५ एसटी कर्मचाऱ्यांनाही ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे उद्या शनिवारी (ता. ९ एप्रिल) त्यांच्यासह १०६ जणांना न्यायालयात उभे करण्यात येणार आहे.

भारतीय दंड विधान १४१, १४९, ३५३, ३३२, ४५२, १२० ब आणि ४४८ आदी कलमांच्या आधारे गुणरत्ने यांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये हल्ला घडवून आणणे, कट रचणे, सरकारी कर्मचारी मारहाण आदींचा त्यात समावेश आहे. या संदर्भातील भाषणं पोलिसांना मिळाली आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अटक केल्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार आहे.

मुंबई पोलिसांच्या पथकाने रात्री आठच्या सुमारास गुणरत्न सदावर्ते यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची तब्बल दीड ते दोन तास गावदेवी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास अटक करण्याचा निर्णय घेतला.