Desh

७ राज्यांतील लोकसभेच्या २५२ जागांवर भाजपविरोधात महाआघाडी

By PCB Author

July 05, 2018

नवी दिल्ली, दि. ५ (पीसीबी) – लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीत भाजपविरोधात महाआघाडी होण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. अनेक राजकीय पक्षांनी निवडणूकपूर्व आघाड्यांसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. राज्यातील परिस्थितीनुसार आघाडी करुन राजकीय ताकद वाढवून भाजपला शह देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. ७ राज्यांमधील लोकसभेच्या २५२ जागांवर भाजपविरोधात महाआघाडीसाठी केली जाणार आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, तामिळनाडू आणि जम्मू- काश्मीर या सात राज्यांमध्ये निवडणुकीपूर्वीच महाआघाडी होणार आहे. या सात राज्यांमध्ये २५२ जागा आहेत.  २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने यातील १५० हून अधिक जागांवर विजय मिळवला होता. तर १२ जागांवर भाजपच्या मित्र पक्षातील खासदार निवडून आले होते. त्यामुळे या जागावर महाआघाडी करून सक्षम उमेदवार देण्यात येणार आहेत.

या राज्यांमधील महाआघाडीची घोषणा आणि जागावाटप निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यावरच केले जाणार आहे, असे सांगितले जाते. २००४ च्या धर्तीवरच विरोधी पक्षांनी रणनिती आखली आहे. २००४ मध्ये वाजपेयी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी अनेक राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी केली होती. त्यावेळी भाजपला जोरदार धक्का बसला होता.